पुढाऱ्यांच्या प्रवेश बंदीची राज्यभर व्याप्ती दोन हजार गावांमध्ये फलक झळकले!

मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली
पुढाऱ्यांच्या प्रवेश बंदीची राज्यभर व्याप्ती दोन हजार गावांमध्ये फलक झळकले!
Hp

मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाला बुधवारी आंतरवाली सराटी येथे प्रारंभ झाला. तर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, पुढाऱ्यांच्या गाव प्रवेश बंदी आंदोलनाची व्याप्ती वाढली असून राज्यातील दोन हजारांहून अधिक गावांमध्ये गावबंदीचे फलक झळकले आहेत.

जरांगे-पाटील यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली आहे. आत्महत्येचा मार्ग न स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले. तरीही नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला असून, पंढरपुरात सर्वच पक्षांचे नेते, खासदार, आमदार, मंत्री, पदाधिकाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आता नेत्यांना मराठा आरक्षण मिळाल्यावरच विठ्ठलनगरीत प्रवेश दिला जाणार आहे, असा निर्धार मराठा आंदोलकांनी बोलून दाखविला. आता गावोगावी प्रवेशबंदीचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यात रान पेटवले असून, राज्य शासनाला दिलेल्या मुदतीत आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय न झाल्यास पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य शासनाने जरांगे पाटील यांच्याकडे ४० दिवसांचा अवधी मागितला होता. त्यानुसार जरांगे पाटील यांनी ४० दिवसांचा अवधी देण्याचे मान्य केले होते. मात्र, २४ ऑक्टोबरला राज्य शासनाने दिलेली मुदत संपुष्टात आली. तरीही आरक्षणावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केले. त्यामुळे राज्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाले असून, आता ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पंढरपुरातही सर्वच पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, मंत्री, पदाधिकाऱ्यांना पंढरीत येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे विठ्ठल दर्शनाला राजकीय पुढाऱ्यांना आता पंढरीत जाता येणार नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांची गोची होणार आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू करण्यापूर्वी आता गावोगाव आरक्षणाचे लोण पोचले पाहिजे आणि शांततेने आंदोलन सुरू करून राज्य सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडले पाहिजे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

अनेक ठिकाणी गावबंदी

राज्यात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला असून, एकमुखी ठराव घेऊन राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात जवळपास १०९ गावांत नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसे फलक गावोगावी चौकात लावण्यात आले आहे. लातूर, नांदेड, परभणी, संभाजीनगर जिल्ह्यांतील अनेक गावांत असे फलक लावण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातही अनेक गावांत राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली.

संभाजीराजेंचा मान राखला

मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी अन्न-पाणी त्याग केले. मात्र, पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीराजे जरांगे पाटील यांच्या भेटीला आंतरवाली सराटी येथे गेले. त्यावेळी संभाजीराजेंच्या विनंतीवरून जरांगे यांनी पाणी पिले. यावर जरांगे म्हणाले, ‘‘५० टक्क्यांवरील आरक्षण टिकणारे नाही. त्यामुळे सरकारने ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण द्यावे. आम्ही राजगादीचा मान राखतो, म्हणूनच संभाजीराजेंच्या विनंतीवरून पाणी घेतले, यापुढे अन्न-पाणी आणि औषधही घेणार नाही,’’ असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in