ससून डॉकचा चेहरामोहरा बदलणार नुतनीकरणासह नवीन जलवाहिन्या टाकणार

ससून डॉक हे सर्वात मोठे होलसेल मासळी विक्रीचे केंद्र असून हे डॉक मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित येते.
ससून डॉकचा चेहरामोहरा बदलणार नुतनीकरणासह नवीन जलवाहिन्या टाकणार

मुंबई : कुलाबा येथील ससून डॉकमधील जेटीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. नुतनीकरणासह येथील जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. जलवाहिनी टाकण्यासह इतर कामांसाठी महाराष्ट्र मस्त्योद्योग विकास महामंडळाच्या वतीने सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी महापालिका प्रशासनाला अदा करण्यात आला आहे.

ससून डॉक हे सर्वात मोठे होलसेल मासळी विक्रीचे केंद्र असून हे डॉक मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित येते. या ससून डॉकचे नूतनीकरण करताना या भागातील पाणीपुरवठा सेवेत सुधारणा करण्यासाठी पालिकेच्या वतीने जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग ते ससून गोदी मासेमारी बंदर गेटपर्यंत रामभाऊ साळगावकर व शहीद भगतसिंह मार्गावरून ४५० मिमी. व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार असून यासाठी महापालिकेला महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाने २ कोटी ३८ लाख ०१ हजार रुपये महापालिकेत जमा केले आहेत.

उर्वरीत ठेवी रक्कम ७३ लाख ४३ हजार ८५९ रुपये अशाप्रकारे ३ कोटी ११ लाख रुपयांची रक्कम महापालिकेत ठेवीच्या स्वरूपात जमा आहे. तसेच प्रत्यक्ष कामाच्या वेळी खर्चात वाढ झाल्यास वाढीव रक्कम महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ यांच्याकडून घेतली जाईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या भागात जलवाहिनी टाकण्यासाठी पालिकेच्या वतीने निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in