राणी बागेतील ‘पेंग्विन’च्या लोकप्रियतेची ख्याती सर्वदूर; आता 'या' राज्यांमधूनही मागणी

युवा सेना अध्यक्ष व माजीमंत्री आदित्य ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या आणि राणी बागेतील पर्यटकांचे विशेषत: बच्चे कंपनीचे खास आकर्षण ठरलेल्या पेंग्विनची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे. आता...
राणी बागेतील ‘पेंग्विन’च्या लोकप्रियतेची ख्याती सर्वदूर; आता 'या' राज्यांमधूनही मागणी

गिरीश चित्रे / मुंबई

युवा सेना अध्यक्ष व माजीमंत्री आदित्य ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या आणि राणी बागेतील पर्यटकांचे विशेषत: बच्चे कंपनीचे खास आकर्षण ठरलेल्या पेंग्विनची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे. आता ओडिशा, गुजरातसह उत्तर प्रदेशातील गोरखपूर, लखनौ येथील प्राणीसंग्रहालयांनीसुद्धा मुंबईच्या राणी बागेतील काही पेंग्विन आमच्याकडेही पाठवा, अशी विनंती राणीबाग प्राधिकरणाला पत्रव्यवहाराद्वारे केली आहे. त्यास भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दुजोरा दिला आहे.

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय देशभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. मुंबई महापालिकेच्या या उद्यान व प्राणी संग्रहालयात १५ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर असे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २५६ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पतीसुद्धा आहेत. रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चेकंपनीसह मोठ्यांचे ही राणी बाग आकर्षणाचे केंद्रस्थान ठरली आहे. राणी बागेत दररोज ७ ते ८ हजार पर्यटक भेट देतात.

सणासुदीच्या काळात, सार्वजनिक सुट्टी व शनिवार व रविवारी तर पर्यटकांचा आकडा ३५ ते ४० हजारांपर्यंत जातो. मुंबईकर, देशविदेशातील पर्यटकांची तोबा गर्दी होते. राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतंय ते म्हणजे पेंग्विनचा कक्ष. २६ जुलै २०१६ मध्ये राणी बागेत कोरियावरुन ८ हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आले. गेल्या काही वर्षात हे परदेशी पाहुणे भारतीय वातावरणात चांगलेच रुळले आहेत. तसेच, पेंग्विनची संख्याही आता १८ वर पोहोचली आहे. पेंग्विनची धमाल मस्तीची बच्चे कंपनीसह लहान मोठ्यांना भुरळ पाडत आहे. त्यामुळेच मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेल्या पेंग्विनना आता अन्य राज्यांमधूनही मागणी होऊ लागली आहे.

या राज्यातून डिमांड

गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यातून पेंग्विनची मागणी होत आहे. पर राज्यात पेंग्विन दिल्यास त्याठिकाणच्या प्राणी संग्रहालयामार्फत लांडगा, तरससह सिंह हे मिळावे, अशी अपेक्षा डॉ. त्रिपाठी यांनी व्यक्त केली. पेंग्वीनच्या आदानप्रदानासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची रितसर परवानगी घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.

तिकीटाचे दर परवडणारे!

या उद्यानात प्रवेशासाठी प्रती व्यक्ती रुपये ५० रुपये इतके शुल्क असून ३ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी रुपये २५ रुपये इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येते. तर आई - वडील आणि १५ वर्षे वयापर्यंतची २ मुले अशा ४ व्यक्तींच्या कुटुंबासाठी १०० रुपये इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते.

दोन महिन्यांत चार लाख पर्यटकांची भेट

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात दररोज ७ ते ८ हजार पर्यटक भेट देतात. सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी होते. जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ४ लाख ७३ हजार ६८४ पर्यटकांनी भेट दिली. तर पर्यटकांच्या माध्यमातून १ कोटी ८८ लाख ९२ हजार ६९२ रुपये महसूल मिळाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in