वाशीतील पहिला पादचारी पूल फेब्रुवारी अखेर पूर्ण होणार

सिडकोने नवी मुंबईची निर्मिती करतांना वाशी नोडपासून प्रारंभ केला. त्या वेळी पुढील काही वर्षांत वाढती लोकसंख्या, वाहने यांचा सिडकोने बांधलेला अंदाज काही प्रमाणात फेल गेला
वाशीतील पहिला पादचारी पूल फेब्रुवारी अखेर पूर्ण होणार

नवी मुंबई : वाशी-कोपरखैरणे या मुख्य रस्त्यावर एकही पादचारी पूल नाही. त्यामुळे पादचाऱ्यांकडून ठिकठिकाणी रस्ता ओलांडण्यामुळे मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पादचारी पूल बांधण्याचे काम चालू आहे. वाशी सेक्टर ९ येथील या पहिल्या पादचारी पुलाच्या कामातील काही तांत्रिक अडचणी दूर झाल्या नंतर हे काम गतीने चालू आहे. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हे काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी व्यक्त केली.

सिडकोने नवी मुंबईची निर्मिती करतांना वाशी नोडपासून प्रारंभ केला. त्या वेळी पुढील काही वर्षांत वाढती लोकसंख्या, वाहने यांचा सिडकोने बांधलेला अंदाज काही प्रमाणात फेल गेला. त्याचा प्रत्यय सध्या वाशी सेक्टर १ ते सेक्टर २८ पर्यंत गर्दीच्या वेळी सर्वांना येत आहे. वाशी सेक्टर ९,१०,११,१४,१५,१६ या विभागात पुष्कळ प्रमाणात झालेले वाणिज्यकरण (व्यवसाय) आणि अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांनी केलेले बहुमजली बांधकाम,  पुनर्विकासामुळे काही घरांची वाढलेली संख्या, विशेषतः सण उत्सव या काळात खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक वाशीतच अधिक प्रमाणात येणे. यांमुळे सेक्टर ९ ते १४ हा परिसरा बाराही महिने वाहने आणि पादचारी यांनी ओव्हर फ्लो असतो. परिणामी वाशी रेल्वे स्थानक येथून कोपरखैरणे येथे जाण्यासाठी निघालेला प्रवाशी गर्दीच्या वेळात अर्धा तासाने घरी पोचतो. (अन्य वेळी १५ मिनिटे वाशी ते कोपरखैरणे प्रवासाला लागतात.) अशी स्थिती गेल्या काही वर्षांपासून झाली आहे. यावर उपाय म्हणून पहिल्या टप्प्यात शहर अभियंता विभागाने अधिक गर्दीच्या ठिकाणी वाहनेही पार्क व्हावी आणि पादचाऱ्यांनाही चालणे सुलभ व्हावे, अशी पदपथांची पुनर्बांधणी केली. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याची आवश्यकता आहे, तेथे पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार वाशीतील पहिला पादचारी पूल वाशी सेक्टर ९ येथे बांधण्याचे काम चालू आहे. या कामामध्ये काही तांत्रिक बाबीमुळे (न्यायालयीन) विलंब झाला होता. आता हा तांत्रिक अडथळा दूर झाल्याने काम अधिक गतीने पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. २ कोटी ४४ लाख रुपये खर्चाचे हे काम असून पुलाची लांबी २७ मीटर  व रुंदी ३ मीटर इतकी आहे. या ठिकाणी २ लिफ्ट देखील बसवण्यात येणार आहे. यामुळे जेष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना पूल चढ - उतार करण्यास सहाय्य होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in