१ जूनपासून धावणार पहिली ‘शिवाई’ वातानुकूलित बस

प्रदूषणुक्त प्रवास, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवरील वातानुकूलित ‘शिवाई’ बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला
 १ जूनपासून धावणार पहिली ‘शिवाई’ वातानुकूलित बस

एसटी वर्धापनदिनी म्हणजेच १ जूनपासून विजेवर धावणारी पहिली ‘शिवाई’ वातानुकूलित बस पुणे- अहमदनगर मार्गावर सुरू करण्यात आली. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच आणखी इलेक्टि्रक बस पुढील काही महिन्यांत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. असे असतानाच येत्या ऑक्टोबरपासून पुण्यासाठी मुंबई, ठाण्यातून टप्प्याटप्प्याने ‘शिवाई’ची सेवा सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या मार्गावर एकूण ९६ ‘शिवाई’ बस धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

प्रदूषणुक्त प्रवास, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवरील वातानुकूलित ‘शिवाई’ बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने वातानुकूलित १५० बस दाखल होणार असून पहिल्या टप्यात ५० बस आणि दुसऱ्या टप्प्यात १०० बस दाखल होतील. ५० पैकी दोन बस पुणे–अहमदनगर–पुणे मार्गावर धावत आहेत. पुणे-नाशिक-पुणे, पुणे-औरंगाबाद-पुणे, पुणे-कोल्हापूर-पुणे आणि पुणे-सोलापूर-पुणे मार्गावर या बस प्रवाशांच्या सेवेत येतील. पहिल्या टप्प्यात येत्या जुलैअखेरीस १७ बस, दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबरपासून १७ आणि जानेवारी २०२३ पासून १६ बस सेवेत दाखल होतील. दरम्यान, एसटीच्या ताफ्यात आणखी १०० ‘शिवाई’ बस दाखल होणार आहेत. यापैकी ९६ बसचे मार्ग आणि तारीखही निश्चित करण्यात आली असून मुंबई, ठाण्यातून पुणे रेल्वेस्थानक, स्वारगेटसाठी येत्या ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने ‘शिवाई’ बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

दादर-पुणे रेल्वेस्थानक व्हाया चिंचवड, परेल-स्वारगेट, ठाणे-स्वारगेट, बोरिवली-स्वारगेट असे मार्ग निश्चित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ९६ पैकी ऑक्टोबरपासून ३०, जानेवारी २०२३ पासून ४० आणि एप्रिल २०२३पासून २६ ‘शिवाई’ बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in