आठवडाभर आधीच कळणार प्रदूषणाचा अंदाज; मुंबई महापालिकेला उपाययोजना करणे शक्य होणार

गेल्या काही महिन्यांपासून प्रदूषण वाढत असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत
आठवडाभर आधीच कळणार प्रदूषणाचा अंदाज;
मुंबई महापालिकेला उपाययोजना करणे शक्य होणार
PM

मुंबई : हिवाळ्यात प्रदूषण वाढीचा धोका लक्षात घेता मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बांधकाम ठिकाणी २७ प्रकारची नियमावली जारी केली असून आता आठवडाभर आधी प्रदूषणाचा अंदाज कळणार आहे. यासाठी ‘सफर’ संस्थेसोबत पालिकेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असून, आठवड्याभराचा प्रदूषण अंदाज मिळाल्यामुळे पालिकेला धोका कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्रदूषण वाढत असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणाहून उडणार्‍या धुळीमुळे प्रदूषण वाढून हवेची गुणवत्ता खालावत असल्याने पालिकेने बांधकाम प्रकल्पांना प्रदूषण रोखण्यासाठी २७ प्रकारचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. यामध्ये बांधकामाच्या ठिकाणी ३५ फूट उंच कंपाऊंड वॉल, स्प्रिंक्लर आणि डेब्रिजची वाहतूक बंदिस्तपणे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय बांधकामाजळ वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी, बांधकाम ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे, दिवसात ४ ते ५ वेळा पाण्याची फवारणी करणे अशा नियमांचा समावेश आहे. या नियमांच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी पालिकेने पोलीस कर्मचार्‍याचा समावेश असलेल्या पाच जणांच्या टीम नियुक्त करून सर्व २४ वॉर्डात कारवाई सुरू केली आहे.

महत्त्वाच्या ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा

हवामान खात्याकडून अतिवृष्टी, वादळ, उष्णतेची लाट अशा आपत्तींचा आठवडा, पंधरावडाभर आधीच अंदाज मिळत असल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे शक्य होते. त्यामुळे नुकसान टळते. याच धर्तीवर ज्या भागात प्रदूषण वाढण्याचा अंदाज मिळेल अशा ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी खबरदारी घेणे, उपायोजना करणे शक्य होणार आहे. यासाठी ‘सफर’च्या माध्यमातून प्रदूषण संवेदनशील ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा बसवण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

चार दिवसांचा एक्यूआय

२४ डिसेंबर - १४५

२५ डिसेंबर - १४९

२६ डिसेंबर - १४०

२७ डिसेंबर - १७८

असा असतो ‘एअर क्वालिटी इंडेक्स’

हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एक्यूआय’ तपासला जातो. यामध्ये ० ते ५० पर्यंत ‘एक्यूआय’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते.

५१ ते १०० दरम्यान  ‘एक्यूआय’ - ‘समाधानकारक हवा’, १०१ ते २०० दरम्यान ‘एक्यूआय’ - ‘मध्यम दर्जाची हवा’, २०१ ते ३०० पर्यंत ‘एक्यूआय’- ‘खराब’ हवा समजली जाते.

तर ३०१ ते ४०० ‘एक्यूआय’ - ‘अतिशय खराब’ तर ४०१ ते ५०० ‘एक्यूआय’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते.

logo
marathi.freepressjournal.in