मुंबई : मुंबईतील विशेष करून पूर्व उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘ईस्टर्न फ्री वे’ची बेरिंग बदलणे, डागडुजी करणे अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ३२ कोटी ६६ लाख रुपये खर्चणार आहे.
मुंबईतून पूर्व उपनगरात मानखुर्द आणि पुढे नवी मुंबई तसेच सायनमार्गे मुलुंडपर्यंत जाण्यासाठी अनुक्रमे, सायन-ट्रॉम्बे रोड व लालबहादूर शास्त्री मार्ग हे दोनच पर्याय होते. शहराचा वाढता विकास आणि नवी मुंबई, पनवेलपर्यंत वाढलेली लोकवस्ती, यामुळे या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. प्रवाशांचे तासनतास प्रवासात जात होते. त्यावर पर्याय म्हणून एमएमआरडीएने सन २०१० मध्ये मस्जिद बंदर येथून पी. डीमेलो रोड ते मानखुर्द, गोवंडीदरम्यान १६.८ किमीचा पूर्व मुक्त मार्ग बांधला. २०१५ मध्ये हा मार्ग देखभालीसाठी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
या मार्गामुळे मस्जिद बंदर ते मानखुर्द हा विनासिग्नल प्रवास अवघ्या २० ते २५ मिनिटांत होऊ लागला आहे. या मार्गाची जबाबदारी पालिकेने घेतल्यानंतर दुरुस्तीची फार मोठी कामे झालेली नाहीत. ही बाब लक्षात घेऊन, या मार्गाची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्गावरील भूमिगत बोगद्यात काही ठिकाणी वरून तसेच भिंतींमधून पाणीगळती होत होती. काही ठिकाणी रस्ता खराब झाला होता. गेल्या सहा महिन्यांपासून ही कामे सुरू करण्यात आली होती. आता ती पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत.
काँक्रिटचा थर उडाल्याने रस्त्याची दूरवस्था
या मार्गावर शहर भागात मशिद बंदर, डॉकयार्ड रोड, कॉटन ग्रीन भागात रस्त्याची स्थिती चांगली आहे. मात्र पूर्व उपनगरात सायन प्रतीक्षानगर, वडाळा भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी, पांजरापोळपर्यंतच्या पट्ट्यात रस्त्याच्या भूपृष्ठावरील काँक्रिटचा थर मोठ्या प्रमाणात उडून रस्त्याची दूरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खडबडित झाला आहे. त्यामुळे गाडी चालवताना वाहनचालकांची कसोटी लागते आहे.