जी २० परिषदेचा मान बेस्ट उपक्रमाला!

प्रतिनिधी करणार इलेक्ट्रिक एसी बसने प्रवास
जी २० परिषदेचा मान बेस्ट उपक्रमाला!
Published on

मुंबई : २१ ते २३ मे दरम्यान मुंबईत होत असलेल्या जी-२० परिषदेच्या प्रतिनिधी रविवारी बेस्ट उपक्रमाच्या लक्झरी बसेसने प्रवास केला. जी-२० परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींचा प्रवासाची सुविधा बेस्ट उपक्रमाने केली आहे. जी-२० परिषदेसाठी आलेल्या २० देशांतील १२० प्रतिनिधींनी बेस्ट उपक्रमाच्या लक्झरी बसेसना पसंती देत बेस्ट उपक्रमाची सार्वजनिक वाहतूक देशातील नंबर वन असल्याची पोचपावती दिली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला हा सन्मान मिळाला आहे. दरम्यान, २० देशांतील आलेल्या प्रतिनिधींनी बेस्टच्या बसने प्रवास केल्याने मुंबईकर प्रवासी आणखी भरभरुन प्रतिसाद देतील, असा विश्वास बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला.


मुंबईत रविवारपासून सुरू झालेल्या जी २० परिषदेच्या पर्यावरण कार्यगटाच्या प्रतिनिधींच्या वाहतुकीची व्यवस्था करण्याचा मान आणि संधी बेस्ट उपक्रमाला मिळाली आहे. त्यामुळे उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेला बेस्ट उपक्रम असा संदेश जागतिक पातळीवर गेला आहे. बेस्ट उपक्रमाकडे ४६४ इलेक्ट्रिक बसेसचा ताफा असून त्यात ५६ लक्झरी बसेसचा समावेश आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत उपक्रमाला ५० टक्के ताफा इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार असून २०२६ पर्यंत १० हजार इलेक्ट्रिक बसेसचा ताफा असेल, असेही लोकेश चंद्र म्हणाले.
इलेक्ट्रिक बसेसमुळे बेस्ट उपक्रमाची वर्षांला ६ मिलियन इंधनाची बचत होणार असून पर्यावरणाला हानी पोहोचवणार्या ६.५ मिलियन टन कार्बनडाय ऑक्साईडपासून मुक्ती मिळणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने पर्यावरणाला आणि सर्वसामान्यांना पोहोचणारी हानी टाळता येणार आहे. या माध्यमातून बेस्ट पुढील १० वर्षांत कार्बन क्रेडिटच्या साहाय्याने अंदाजे ५०० कोटींच्या महसूल मिळवू शकेल. त्यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती लोकेश चंद्र यांनी दिली.

हा बेस्टचा बहुमान!
मुंबईत आजपासून सुरू झालेल्या जी-२० परिषदेच्या पर्यावरण कार्यगटाच्या प्रवासाची व्यवस्था बेस्ट उपक्रमावर सोपवण्यात आली आहे. बेस्टबरोबर ही प्रवास व्यवस्था पुरवण्याचा अधिकृत करार करण्यात आला आहे. अशा प्रकारे एका जागतिक परिषदेच्या शिष्टमंडळाला, प्रतिनिधींच्या प्रवासासाठी एका सार्वजनिक वाहतूक उपक्रमाला पसंती देण्याचा हा मोठा बहुमान आहे, अशी प्रतिक्रिया लोकेश चंद्र यांनी दिली. दरम्यान, अॅपबेस सेवा असलेल्या बेस्ट लक्झरी बसेसच्या सेवेला मुंबईकरांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in