मुंबई : मुलीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून दोन महिलेसह एका दोन वर्षांच्या मुलीवर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून देणाऱ्या दीपक वीरबहादूर जाट या माथेफिरू आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. आगीत गंभीररित्या भाजलेल्या अमरावती रमेश हरिजन आणि दोन वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर कांती इंका ही महिला गंभीररीत्या भाजली होती, असे एसीपी विजय बेळगे यांनी सांगितले.
अमरावती हरिजन ही महिला वांद्रे येथील बी. जे. रोडवरील गणेशनगरात तिचा पती आणि मुलांसोबत राहते. जून २०१७ रोजी तिची मुलगी रोशनी हिची त्याच परिसरात राहणाऱ्या दीपक जाटने छेड काढली होती. हा प्रकार मुलीकडून समजताच तिच्या पालकांनी दीपकची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर त्यांच्यात सतत भांडणे होत होती. १५ एप्रिल २०१७ रोजी दुपारी अमरावती, रोशनी, तिची भाडेकरू कांता इक्का ही तिच्या दोन वर्षांच्या मुलीसोबत घरी काम करत असताना, यावेळी आलेल्या दीपकने त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. काही कळण्यापूर्वीच त्याने त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता.
या प्रकारानंतर रोशनीने इतर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अमरावती, कांता आणि तिच्या मुलीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय बेळगे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. आगीत गंभीररित्या भाजलेल्या तिघांनाही तातडीने पोलिसांनी शीव रुग्णालयात दाखल केले. या तिघांवर उपचार सुरु असताना ९५ टक्के भाजलेल्या अमरावती व कांताची दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. कांताला नंतर उपचारानंतर सोडून देण्यात आले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दीपकविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यांत तो गेल्या सहा वर्षांपासून कारागृहात आहे. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याची नियमित सुनावणी विशेष सेशन कोर्टात सुरू होती. या खटल्याची सुनावणी अलीकडेच संपली होती. यावेळी कोर्टाने त्याला दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे.