
मुंबई : बोरिवली येथे एका २५ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग करून तिच्यासह तिच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी अमन सुरेश बनसोडे याला एमएचबी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
बोरिवली येथे राहणारी तक्रारदार तरुणी रात्री नियमितपणे भटक्या कुत्र्यांना जेवण खाऊ घालण्याचे काम करते. रविवारी रात्री ११ वाजता ती योगीनगर परिसरात कुत्र्यांना अन्न देत असताना तिथे आलेल्या अमनने तिला अश्लील शिवीगाळ करून तिच्याशी विचित्र चाळे करून विनयभंग केला होता. त्यानंतर त्याने तिला आणि तिच्या आई-वडील व भावाला हाताने आणि बांबूने मारहाण केली. तिच्यावर गँग रेपसह जीवे मारण्याची धमकी देऊन तो पळून गेला होता.
घडलेल्या प्रकारानंतर या तरुणीसह तिच्या कुटुंबियांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकातील सचिन शिंदे, डॉ. दीपक हिंडे, निलेश पाटील, घोडके, शिरसाट यांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. या आरोपीच्या नावावरून त्याचे फेसबुक अकाऊंट शोधून त्याच्या कारचा क्रमांक पोलिसांनी मिळविला होता. या कारच्या क्रमांकावरून त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.