महायुतीचा फॉर्म्युला ठरला भाजपला २६, तर शिंदे-पवार गटाला २२ जागा

आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या गोंधळावर फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होतो.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला भाजपला २६, तर शिंदे-पवार गटाला २२ जागा

मुंबई : महायुतीतील लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केले आहे. भाजप २६ जागा लढवणार असून शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळून २२ जागा देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनीं स्पष्ट केले. जिंकणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल, मात्र हा अंतिम शब्द नसल्याचे फडणवीस म्हणाले.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, ‘‘लोकसभेच्या ४८ जागांच्या वाटपाबाबत तीनही पक्षांचे जवळपास एकमत झाले आहे. जिंकणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यावर आमचे एकमत आहे, मात्र कोणालाही दिलेला शब्द अंतिम नसेल. शिंदे गट आणि अजित पवार गट मिळून २२ जागा लढवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी यावर आम्हा तिघांचेही एकमत झाल्याचे म्हटले आहे, मात्र हे जागा वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मान्य असेल का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महायुतीचा आणि भाजपचा वेगळा सर्व्हे झालेला आहे. त्यातून महायुतीला अंदाज आलेला असून ज्या जागा भाजप जिंकू शकते, त्या जागांवर भाजप लढणार आहे. केंद्रात भाजप युतीचे सरकार निवडून आणण्यासाठी महायुतीकडून ताकद लावण्यात येणार आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, फडणवीस यांनी या बातम्यांमध्ये तथ्य नसून मी नागपूरमधील माझ्या पारंपरिक मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असे स्पष्ट केले.

आरक्षणावर लवकरच तोडगा

आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या गोंधळावर फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होतो. एवढेच नाही तर राज्यातील गुंतवणुकीवरही परिणाम होतो. त्यामुळे खूप उशीर होण्यापूर्वी आम्हाला युद्धपातळीवर या समस्या हाताळाव्या लागतील. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले होते, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे परीक्षण करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा लागेल. मात्र, हे करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in