दुर्लक्षितांच्या अशा पल्लवीत झाल्या,सच्चा शिवसैनिकांना संधी मिळणार

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसैनिक म्हणून जो लढा सुरु केला तो लढा आजही कायम आहे
दुर्लक्षितांच्या अशा पल्लवीत झाल्या,सच्चा शिवसैनिकांना संधी मिळणार

शिवसेनेचे आम्हीचं सर्वेसर्वा असा समज काही बंडखोरांचा होता. मात्र आज बंडाळी केल्यानंतर एकनाथ शिंदेसह अनेकांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे अशा बंडखोरांची कायमची हकालपट्टी करावी, असे मत कट्टर शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे. बंडखोरांना त्यांची जागा दाखवल्यानंतर सच्चा शिवसैनिकांना संधी मिळेल, दुर्लक्षितांच्या अशा 'पल्लवी' त झाल्या आहेत.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसैनिक म्हणून जो लढा सुरु केला तो लढा आजही कायम आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सच्चा शिवसैनिक म्हणून आम्ही आम्हाला दिलेली जबाबदारी पार पाडतो. मात्र शिवसेनेत काही नेते असे आहेत ते तळागाळातील शिवसैनिकांच्या असलेल्या अडीअडचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचून देत नाही, अशी खदखद कट्टर शिवसैनिक म्हणून व्यक्त केली जात आहे. विद्यार्थी शाळा सोडून गेला म्हणून शाळा बंद होत नाही. तर चांगले व देशाचे उज्ज्वल भविष्य निर्माण करतील अशा विद्यार्थ्यांचा शोध घेत शाळेत प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे काही नेते गेले म्हणून शिवसेनेला मोठा फटका बसेल हा समज चुकीचा आहे. गेलेल्या नेत्यांमुळे सच्चा शिवसैनिकांला कधीच पुढे येण्याची संधी मिळत नव्हती. मात्र बंडाळीनंतर गद्दारांचा खरा चेहरा समोर आला आहे. शिवसेनेत राहून आज मोठे नेते, मंत्री झाले याचा विसर या बंडखोरांना पडला ही मोठी शोकांतिका आहे. असो जे होते ते चांगल्यासाठीच होते. भविष्यात मोठा दगा फटका होण्याआधी बंडखोरांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यामुळे अशा बंडखोरांची कायमची हाकलपट्टी करावी, असे मत निष्ठावंत शिवसैनिक व्यक्त करत आहेत. शिवसैनिक, गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख या पदावर कार्यरत राहून शिवसेनेसाठी झटत आहोत. आम्ही तळागाळात काम करुनही आम्हाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुभाष देसाई आदींकडे कधीच पोहोचता आले नाही, यामागे मुख्य अडचण होती ती काही नेत्यांची दादागिरी, असा आरोपही काही शाखाप्रमुखांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in