
मुंबई : भायखळा येथील जिजामाता उद्यानात म्हणजेच लहानग्यांच्या आवडत्या राणीबागेत आता विशाल देहाच्या आणि कान हलवून मनोरंजन करणाऱ्या ‘हाथीराजा’चे दर्शन होणार नाही. इथल्या एकमेव हत्तीचे काही दिवसापूर्वीच निधन झाले असून केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार नवीन हत्ती येणार नाही. तर दुसरीकडे पर्यटकांना इतक्यात तरी सिंहाची गर्जना ऐकू येणार नाही. राणीच्या बागेत सिंह कधी येणार याबाबत सध्यातरी अस्पष्टता असल्याचे उद्यान अधीक्षक संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
जिजामाता उद्यानात प्रवेश केल्यावर सर्व पर्यटकांच्या नजरा या डाव्या बाजूच्या प्रवेशद्वारावर साखळदंडात असलेल्या हत्तीवर असायच्या. मोठा हत्ती म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकाचे आकर्षण. राणीच्या बागेच्या १९७७ सालापासून लक्ष्मी आणि अनारकली या दोन हत्तीणी होत्या. त्यानंतर केरळहून एका नर हत्तीलाही आणण्यात आले होते, मात्र तो हत्ती पुन्हा केरळला पाठवण्यात आला. तर चार वर्षांपूर्वी लक्ष्मी या हत्तीणीचा आजाराने मृत्यू झाला. दरम्यान काही दिवसांपूर्वी ५९ वर्षीय अनारकली हत्तीणीचा ट्यूमरने मृत्यू झाला.
शरीरात दीडशे किलोचा ट्यूमर
अनारकली हत्तीणीच्या शरीरात दीडशे किलोचा गोळा असल्याचे शवविच्छेदनानंतर निष्पन्न झाले. हा गोळा ट्यूमर असल्याचे लक्षात आले नाही. भव्य शरीरयष्टी असलेल्या प्राण्यांची शारीरिक तपासणी करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. जिवंतपणी अनारकलीमध्ये ट्युमरची कोणतीच लक्षणे दिसली नसल्याचे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.