मुंबई : समजा, फेरीवाल्याचा आवाज गेला तर काय होईल, याची कल्पना देखील करवत नाही. गेली २० वर्षे फेरीवाला म्हणून काम करणाऱ्या निशिकांत भागवत हे भाईंदरला भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते. गेल्या ५ वर्षांपासून त्यांच्या आवाजात बदल होत होता. हळूहळू ते अडखळत बोलायला लागले. काही दिवसांनी त्यांचे उच्चार अस्पष्ट होत गेले. त्यांना उपचारांसाठी बोरिवलीच्या अपेक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात स्वर व्हॉइस अँड स्वालोविंग क्लिनिक येथे पाठवले आणि उपचारानंतर त्यांना त्यांचा आवाज परत मिळाला.
ईएनटी आणि व्हॉईस सर्जन लॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. बिन्ही देसाई यांच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आवाजाच्या समस्यांसाठी सुवर्ण मानक चाचणी मानली जाणारी स्ट्रोबोस्कोपी करण्यात आली. या चाचणीमध्ये रुग्णाला स्पास्मोडिक डिस्फोनिया झाल्याचे दिसून आले. असे डॉ. बिन्ही देसाई म्हणाल्या.
स्पास्मोडिक डिस्फोनिया हा एक न्यूरोलॉजिक विकार आहे, जो आवाज आणि बोलण्यावर परिणाम करतो. या आजारात आवाज निर्माण करणारे स्नायू आकुंचन पावतात, त्यामुळे आवाज निघण्यास अडथळा येतो. हा एक अत्यंत दुर्मिळ आजार असून एक लाखामध्ये एक रुग्ण आढळून येतो. स्पास्मोडिक डिस्फोनियामध्ये अत्याधुनिक उपचारपद्धती म्हणजे व्हॉईस बॉक्सच्या प्रभावित स्नायूमध्ये बोटॉक्स इंजेक्शन देऊन आवाज पूर्ववत केला जातो.