आरोग्य यंत्रणा सुरक्षित करणे गरजेचे

आरोग्य यंत्रणा सुरक्षित करणे गरजेचे

चीनच्या वुहान शहरातून जगभरात थैमान घालणारा कोरोना विषाणू हा अनुभव सगळ्याच देशांसाठी नवीनच होता. आरोग्यम धनसंपदा असलेल्या इटली देशाचीही आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्याही आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला. कोरोना विषाणू काय प्रकार हे समजण्याआधीच कोरोनाने मुंबईकरांना सावज बनवले. कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर जोर दिला जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे; मात्र प्रत्यक्षात कृतीची गरज असून भविष्यात कुठलाही विषाणू धडकला तर त्याचा सामना करत मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणे अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे आरोग्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते त्या निधीचा पुरेपूर वापर करत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज झाली आहे, हेही तितकेच खरे!

कोरोनाच्या तीन लाटा आतापर्यंत मुंबईत धडकल्या होत्या. तिन्ही लाटा परतवण्यात पालिकेला यशही आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे जगभरात कौतुक करण्यात आले. मुंबईत १०० टक्के लसीकरण झाल्याने मृत्युदर रोखण्यात यश आले आहे. तिन्ही लाटा थोपवण्यात यश आल्यानंतर घडाळ्याच्या काट्यावर मुंबई पुन्हा एकदा धावू लागली असतानाच वाढती रुग्णसंख्या पाहता चौथ्या लाटेने मुंबईत पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटा परतवण्यात यश आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला यात दुमत नाही; मात्र भविष्यात कोरोना महामारीचे बदलते रूप समोर आल्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे, बाधितांवर वेळीच उपचार करणे, यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आरोग्य आराखडा तयार करणे गरजेचे आहे. कुठलाही विषाणू धडकला तरी त्याचा सामना करता येईल, अशी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित केली तरच मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणे भविष्यात डोईजड जाणार नाही, याचा विचार करणे आवश्यक आहे.

केईएम, नायर व सायन ही महापालिकेची प्रमुख रुग्णालये असून १६ सर्वसाधारण रुग्णालये आहेत. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील सर्व मोठी रुग्णालये ब्रिटिशकाळात बांधण्यात आली आहेत. योग्य उपचार पद्धती यांमुळे मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मोठ्या विश्वासाने रुग्ण धाव घेतात; परंतु कोरोना नावाचा विषाणू आला आणि मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला पाहावयास मिळाला. कोरोना विषाणू काय हे माहीत नसल्याने तातडीने नियंत्रण मिळवणे शक्य नव्हतेच; परंतु पहिली, दुसरी व तिसरी लाट रोखण्यात यश आल्यानंतर आरोग्य विभागाचा आत्मविश्वास वाढला आहे, यात दुमत नाही. भविष्यात अशी संकटे येतील आणि जातील, कधी वादळ, पूरस्थिती या गोष्टी होतच राहणार; मात्र मुंबईत कुठलीही आपत्कालीन परिस्थितीत ओढावली तर त्याचा सामना करत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना असो वा कोरोनाचे बदलते स्वरूप यातून धडा घेत आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देणे गरजेचे आहे, हेही तितकेच खरे.

प्लेग, टीबी, कुष्ठरोग हे आजार आले आणि त्यावर औषधही उपलब्ध झाले; परंतु आजही या आजारांचा धोका आहेच. कोरोनाचे नवीन संकट ओढावले. जीवघेण्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रात्रंदिवस लढाही दिला आणि देत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. त्यामुळे मुंबई महापालिकेचे सर्वच स्तरातून कौतुकही करण्यात आले. आता चौथ्या लाटेचे संकट ओढावले आहे. भविष्यात कोरोनाचे संकट दूर होईलच; मात्र भविष्यात पुन्हा असाच जीवघेणा वायरस पसरला तर हतबल होण्याची वेळ येऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करणे यावर राज्य सरकार व मुंबई महापालिकेने लक्ष दिले पाहिजे. भविष्यात मुंबईत कुठलाही आजार आल्यास त्या आजाराजाशी दोन हात करण्याची तयारी मुंबई महापालिकेने करावीच; परंतु आरोग्याच्या नावाखाली स्वतःचे आरोग्य सृदृढ करण्याकडे भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत सर्वोपयोगी अद्ययावत आरोग्य विभाग करावा, याचा विचार केला पाहिजे. कोरोनाच्या संकटात प्रत्येकाने आपला कोण तरी गमावला आहेच. त्यामुळे भ्रष्ट कारभाराला केराची टोपली दाखवत भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सक्षम आरोग्य यंत्रणा घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत दरवर्षी मुंबई महापालिका तीन ते चार हजार कोटींची तरतूद करते; मात्र तरतूद पैशांपैकी खरंच सगळा पैसा आरोग्यावर खर्च होतो का, हे न सुटणारे कोडे आहे. मुंबई क्षयरोग मुक्तीचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. त्याप्रमाणे भ्रष्टमुक्त आरोग्य विभाग ही मोहीम यशस्वी राबवली तर भविष्यात कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी उभी राहील, हे कोणीही नाकारू शकत नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in