मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अडले मलईदार खात्यांत

केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाचाही परिणाम
मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अडले मलईदार खात्यांत
ANI

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री समाविष्ट होऊन एक आठवडा झाला आहे. तरीही या मंत्र्यांचे अद्याप खातेवाटप झालेले नाही, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या अनेकांना आस लागून राहिलेला मंत्रिमंडळ विस्तारही रखडलेलाच आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य बदल रखडल्याने व ‘अर्थ’ व ‘सहकार’ या मलईदार खात्यांवरून सरकारमधील तीन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याने हा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे समजते. मात्र, खातेवाटप आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यामुळे तीन पक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना व भाजपच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे आश्वासन देत आहेत. त्यातच मागून सरकारमध्ये आलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथही देण्यात आली. त्यामुळे शिवसेना-भाजपचे आमदार नाराज झाले आहेत. पण, मंत्रिमंडळ विस्तारास विलंब होण्यास केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल व ‘अर्थ’ व ‘सहकार’ खात्यांवरून महायुतीतील तिन्ही पक्षांत सुरू असलेला वाद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार यांच्याकडे ‘अर्थ’ खाते दिल्यास ते पूर्वीप्रमाणेच शिवसेनेच्या मतदारसंघातील निधी अडवून ठेवतील, अशी भीती शिंदे गटाला वाटत आहे. तसेच राष्ट्रवादीने ‘सहकार’ खात्यावरही दावा केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, भाजप त्यांना हे खाते देण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीची ग्रामीण भागात चांगली पकड आहे. कारण त्यांच्याकडे सहकारी संस्थांचे मोठे जाळे आहे. क्रेडिट सोसायटी, बँका, साखर कारखाने यांच्यावर त्यांचे वर्चस्व आहे.
केंद्र सरकारमध्ये नव्याने निर्माण झालेल्या सहकार खात्याचे प्रमुख म्हणून अमित शहा काम करत आहेत. या सहकार खात्यात अन्य कोणी पक्षाने प्रवेश करावा, असे भाजपला वाटत नाही.

केंद्रीय मंत्रिमंडळात आज फेरबदलाची शक्यता
केंद्रीय मंत्रिमंडळात मंगळवारी फेरबदलाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांना वगळणार असल्याची शक्यता आहे. त्या बदल्यात शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा समावेश केला जाण्याचा अंदाज आहे. या फेरबदलाचा थेट राज्याच्या मंत्रिमंडळाशी संबंध नाही. पण, पक्षांना मंत्रिपदे देताना विभागीय संतुलन साधता येऊ शकेल. ज्या केंद्रीय मंत्र्यांना वगळले जाईल, त्या भागातील आमदारांना राज्यात मंत्रिपदाची संधी मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी परदेश दौऱ्यावर निघत आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला उद्याचा एकच दिवस शिल्लक आहे

logo
marathi.freepressjournal.in