अल्पवयीन मुलाची पित्याकडून चाकूने भोसकून हत्या

आलोक दिनेश गुप्ता या १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर आरोपी पिता दिनेश रामकुमार गुप्ता याला वाकोला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली आहे.
अल्पवयीन मुलाची पित्याकडून चाकूने भोसकून हत्या

मुंबई : अल्पवयीन मुलाची पित्यानेच चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना सांताक्रुझ परिसरात घडली. त्यात आलोक दिनेश गुप्ता या १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर आरोपी पिता दिनेश रामकुमार गुप्ता (४४) याला वाकोला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजता सांताक्रुझ येथील वाकोला ब्रिज, दत्त मंदिर रोडच्या वाघरीवाड्यात घडली. याच परिसरातील दुर्गा माता चाळ क्रमांक दोनमध्ये दिनेश हा त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता. दिनेश हा काहीच कामधंदा करत नसून त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. याच कारणावरून त्याचे मुलगा आलोकसोबत नेहमी खटके उडत होते. रविवारी सायंकाळी दिनेश हा नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करून घरी आला होता. यावेळी त्याचे आलोकसोबत वाद झाला, याच वादातून त्याने आलोकवर घरातील चाकूने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ही माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दिनेशची मुलगी प्रीती गुप्ता हिच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी वडील दिनेश गुप्ताला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in