
नवी दिल्ली : जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये समावेशाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारताकडे सध्या जगाचे लक्ष आहे. देशात ४३ कोटींचा मध्यमवर्ग असून, त्यांचे सरासरी उत्पन्न वर्षाला ९.२५ लाख रुपये आहे. हा मध्यमवर्ग ७४ टक्के रक्कम खाणे, शिक्षण, प्रसाधन, कपडे व विविध वस्तूंवर खर्च करतो. या प्रचंड बाजारपेठेमुळे जगातील सर्वच देश भारताकडे आकृष्ट झालेले आहेत, तर भारतातील ९३ कोटी लोकांची कमाई ही ५ लाखांपर्यंत आहे.
पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कंझ्युमर इकॉनॉमी (प्राइस) या संस्थेच्या अहवालात हे खुलासे झाले आहेत. २५ राज्यांत ४० हजार लोकांच्या मुलाखती घेऊन हे सर्वेक्षण केले आहे. भारतात ३० लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या ५.६ कोटी लोकांचे वार्षिक उत्पन्न ३५.७७ लाख आहे. हे लोक ५७ टक्के पैसा गरज असलेल्या वस्तूंवर खर्च करतात. त्यांची बचत १७ टक्के आहे, तर ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेले ९३ कोटी लोक भारतात राहत आहेत. त्यांच्या गरजा त्यांच्या कमाईपेक्षा अधिक आहेत. त्या गरजा पूर्ण करायला त्यांना कर्ज घ्यावे लागते. तरीही देशातील ७३ टक्के जनतेवर कोणतेही कर्ज नाही. गरीबांच्या तुलनेत श्रीमंतांवर तीन पट अधिक कर्ज आहे. हे कर्ज त्यांना परंपरेने मिळाले आहे.
मध्यमवर्गीयांची वार्षिक कमाई ८४ लाख कोटी
भारतात जगात सर्वात जास्त मध्यमवर्ग आहे. तो सर्वात वेगाने वाढत आहे. त्याची खर्च करण्याची क्षमता मोठी आहे. या मध्यमवर्गीयांची वार्षिक कमाई ८४ लाख कोटी होती. त्यातील ६२ लाख कोटी रुपये त्यांनी बाजारात खर्च केले.
कर्ज घेण्यात १.२५ ते ५ लाख उत्पन्नवाले आघाडीवर
१.२५ ते ५ लाख रुपये उत्पन्न असलेल्या लोकांची बचत वर्षाला २६ हजार आहे. त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करायला कर्ज घ्यावे लागते. ५ ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या वर्गाची बचत १.२९ लाख रुपये आहे.
देशात ३८ टक्के कर्ज हे कृषीचे घेतले जाते, तर श्रीमंत लोक ४० टक्के कर्ज हे मालमत्ता खरेदीसाठी घेतले जाते, तर गरीब लोक वैद्यकीय उपचार व लग्नासाठी कर्ज घेत असतो.
हॉटेलिंगवर भरपूर खर्च
कुटुंबासमवेत बाहेर जेवायला श्रीमंत भारतीय वर्षाला १.०३ लाख रुपये खर्च करतात, तर मध्यमवर्ग २२ हजार रुपये, कनिष्ठ वर्ग ६ हजार रुपये खर्च करतो.
शीतपेय, हवाबंद अन्नावर श्रीमंत १.५४ लाख रुपये, मध्यमवर्ग ४९ हजार, तर गरीब लोक १२ हजार रुपये खर्च करतात. मनोरंजनावर श्रीमंत लोक दरवर्षी ६१ हजार, मध्यमवर्गीय १७ हजार, तर गरीब लोक ४ हजार रुपये खर्च करतात. पर्यटन व टूर पॅकेजवर श्रीमंत वर्षाला १.७४ लाख, मध्यमवर्ग ४४ हजार, तर गरीब लोक ११ हजार रुपये खर्च करतात. अन्नधान्य खरेदीसाठी गरीब लोक ४५ टक्के, मध्यमवर्ग २३ टक्के, तर श्रीमंत लोक ११ टक्के खर्च करतात.