
मुंबई : वांद्रे टर्मिनसवर एक्स्प्रेस पकडताना शनिवारी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १० प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. आता रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
शनिवारी पहाटे २.४५च्या सुमारास वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस पकडताना प्लॅटफॉर्म क्रमांक-१वर प्रचंड गर्दी उसळली होती. ही ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच ती पकडताना लोकांनी धाव घेतली. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. ही एक्स्प्रेस प्रवाशांनी खच्चून भरली होती. तरीही सकाळी ५.१० वाजता निर्धारित वेळेनुसार ही ट्रेन सोडण्यात आली. दिवाळी आणि छटपूजेनिमित्त गावी उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची तोबा गर्दी उसळली होती.
“या अपघाताची चौकशी आम्ही सुरू केली आहे. अपघातावेळी टर्मिनसवर पोलीस आणि रेल्वे संरक्षण दल उपस्थित असतानाही, प्रवाशांची इतकी गर्दी कशी जमली, याचा तपास सुरू आहे,” असे रेल्वे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. इंद्रजित साहनी (१९) आणि नूर मोहम्मद शेख (१८) हे गंभीर जखमी असून १० जखमींपैकी तीन जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.