
आयपीएलच्या १५व्या हंगामाचा अंतिम सामना सायंकाळी साडेसात ऐवजी आठ वाजता सुरू होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केले. दोन वर्षांनंतर प्रथमच आयपीएलचा अंतिम सामना भारतात होणार असल्याने या लढतीपूर्वी समारोप सोहळा रंगणार आहे.
२९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. नियोजित वेळेप्रमाणे ७.३० वाजता लढत सुरू होणे अपेक्षित होते. परंतु बीसीसीआयला हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करायचा आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग, संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह असंख्य मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित असतील. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा हेदेखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असून सायंकाळी ६.३०च्या सुमारास या सोहळ्याला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.
२०१९मध्ये भारतात अखेरचा आयपीएल अंतिम सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर २०२०मध्ये कोरोमामुळे संपूर्ण आयपीएल संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे खेळवण्यात आली. तर २०२१मध्ये आयपीएलचा पहिला टप्पा फक्त भारतात झाला. त्यानंतर काही संघांमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे उर्वरित आयपीएल युएईमध्ये झाली. “आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआय उत्सुक आहे. तसेच हे स्पर्धेचे १५वे पर्व असल्याने समारोप सोहळा दिमाखात आयोजित करण्यावर आमचा भर आहे. साधारणपणे एक किंवा दीड तास हा सोहळा रंगणार असल्याने अंतिम सामना अर्धा तास विलंबाने सुरू होईल,” असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
‘आझादी का अमृत महोत्सव’ या संकल्पनेअंतर्गत भारतीय क्रिकेट संघाचा ७५ वर्षांचा इतिहास या सोहळ्यात दाखवण्यात येईल. यावर आधारित खास चित्रफीत मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात असल्याचे गांगुलीने सांगितले. त्याशिवाय कोलकाताच्या ईडन गार्डन येथे प्ले-ऑफचे दोन सामने होणार असल्याने तेथेही छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे.