घाटकोपरमधील नागरिकांचा खड्डे प्रवास सुरुच

वर्क ऑर्डर देऊनही पूर्वेतील रस्ते कामे रखडली
घाटकोपरमधील नागरिकांचा खड्डे प्रवास सुरुच

मुंबई : मुंबईतील रस्ते पुढील दोन वर्षांत खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. मात्र पूर्व उपनगरातील घाटकोपर, विद्याविहार येथील ४६ रस्तेकामांची जानेवारी २०२३ मध्ये वर्क ऑर्डर देऊनही काम सुरू करण्याचा मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे घाटकोपर, विद्याविहार येथील नागरिकांचा खड्डे प्रवास सुरुच आहे. दरम्यान, पावसाळ्यानंतर तरी ही कामे हाती घ्यावीत. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण येत्या दोन वर्षात करून रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत. या कामांसाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आल्या होत्या. ६,०७८ कोटींच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातून पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली व जानेवारी महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. तर फेब्रुवारीअखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यापैकी १११ रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामेच सुरू झालेली नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी तातडीने कामे हाती घेणे आवश्यक होती, त्या ठिकाणी रस्त्यांची कामेच सुरू न झाल्यामुळे हे रस्ते खड्डेमय झाले आहेत. काँग्रेसचे ईशान्य मुंबईतील कार्यकर्ते दीपक जाधव यांनी पालिका प्रशानाला पत्र लिहून या रस्त्यांकडे लक्ष वेधले आहे.

३९७ किमीच्या रस्त्यांच्या कामांचे कंत्राट तीन वर्षांचे असून ही कामे दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी ११५८ कोटींची २४८ किमी रस्त्यांची कामे ही पूर्व उपनगरातील आहेत. एकूण सुमारे ९०० रस्त्यांच्या कामांसाठी कंत्राट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४५ रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली. ती कामेदेखील पावसाळ्यापूर्वी अर्धवट अवस्थेत पूर्ण झाली आहेत. जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, त्याबाबत चौकशी करावी, अशी मागणी दीपक जाधव यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in