मुंबईकरांची तहान भागवणारे तलाव १८० गावांची भागवतात

मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो
मुंबईकरांची तहान भागवणारे तलाव १८० गावांची भागवतात
Published on

एक कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईकरांची तहान भागवणारी मुंबई महापालिका धरण क्षेत्रातील तब्बल १८० गावांची तहान भागवते. शेती व पिण्याचे पाणी असे दररोज १६० दशलक्ष लिटर पाण्याचा १८० गावांना पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या जलविभागाचे अभियंता पुरुषोत्तम मालावडे यांनी सांगितले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्राची पाहणी दौऱ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईचा पाणीपुरवठा हा १४० किलोमीटर अंतरावर होतो; मात्र धरण क्षेत्र परिसरात राहणाऱ्यांना १६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत असून हे पाणी पिण्यासाठी व शेती कामासाठी वापरतात, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ठाणे महापालिकेतील हद्दीतील रहिवाशांना दररोज १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे मुंबईसाठी सात धरणे असली तरी मुंबई परिसरातील नागरिकांचीही मुंबई महापालिका तहान भागवते, असेही मालावडे यांनी सांगितले. मुबंई शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी दररोज सुमारे ११५० अभियंते व ८९५० कामगार व इतर कर्मचारी वर्ग कार्यरत असतो.

logo
marathi.freepressjournal.in