येऊर येथील भूखंड वनविभागाने केला मोकळा

येऊर येथील भूखंड वनविभागाने केला मोकळा
Published on

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत येऊर गाव येथील वनक्षेत्रातील मोकळ्या भूखंडाचा काही समाजकंटकांतर्फे व्यापारी वापर सुरू होता. मंडप सजावटीसाठी तसेच बांधकाम व्यवसायासाठी लागणारे साहित्य फार मोठ्या प्रमाणावर येथील मोकळ्या भूखंडावर कायमचे जमा करून या जागेचा बिनदिक्कतपणे गोडाऊनसारखा वापर सुरू होता. हे साहित्य वाहून नेण्यासाठी लागणारी रिक्षा, जीप अशी हलकी वाहने, तर टेम्पो, ट्रक यासारखी अवजड वाहने येथे बेकायदेशीररित्या कायमस्वरूपी उभी करून या जागेचा वाहनतळासारखा वापर सुरू होता, असे लक्षात आल्यांनातर वनविभागाने त्यावर कारवाई करून भूखंड मोकळा केला आहे.

मोकळा भूखंड हा बेजबाबदार पर्यटकांकडून मौजमजेसाठी वापरला जात असल्याचे येथे साचलेल्या कचऱ्यावरून स्पष्ट होत होते. थर्माकोल प्लेट्स, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या यांचा कचरा विखुरला होता. प्लास्टिक डांबर टायर इत्यादी वस्तू इथे सर्रास जाळल्या जात असत. या सर्वाचा संरक्षित वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होत असल्याने अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या सर्व संलग्न संस्थांच्या वतीने येऊर परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

त्याला सकारात्मक प्रतिसाद देत वनविभागाने २४ तासाच्या आत केलेल्या धडक कारवाईत येऊर गाव येथील वनजमिनिवरील अतिक्रमणे पूर्णतः हटवण्यात आली आहेत. येथील मोकळ्या भूखंडाचा गैरवापर भविष्यात होऊ नये याकरिता येथे १ मीटर खोलीचा चर खोदण्यात आला आहे.

पर्यटकांसाठी सुविधा केंद्र उभारणार

येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीसारख्या प्रामाणिक व जागरूक पर्यावरण संस्थेच्या भक्कम पाठिंब्यामुळे कारवाईस बळ मिळाले. नजीकच्या काळात अतिक्रमणमुक्त वन जमिनीवर येऊर येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना येथील समृद्ध जैवविविधता तसेच येथील आदिवासी संस्कृतीची माहिती देण्यासाठी सुविधा केंद्र उभारण्याबाबत वनविभाग प्रयत्नशील राहील.

- गणेश सोनटक्के, येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी

logo
marathi.freepressjournal.in