प्रवेशद्वारावर ठळकपणे दिसतील अशा मराठी पाट्या लावण्यासाठी ३० सप्टेंबरची अखेरची मुदत दिल्याचे दुकाने व आस्थापना खात्याच्या प्रमुख अधिकारी सुनिता जोशी यांनी सांगितले. दरम्यान, ३० सप्टेंबरपर्यंत दुकानदारांच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे दिसतील अशा मराठी पाट्या न लावल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. व्यापारी संघटनांच्या मागणीनंतर पालिकेने निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगरातील दुकाने व आस्थापना यांच्या मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या विविध व्यापारी संघटनांनी नामफलक सुधारणा करण्यास मुदतवाढ मिळण्यासाठी विनंती केली होती. या अनुषंगाने नामफलक सुधारणा करण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यास महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.