गिरीश चित्रे / मुंबई
कारगिल युद्धानंतरची मदत असो वा देशात आपत्कालीन परिस्थिती, कोरोनाचे संकट असो अथवा मुंबापुरीतील महापूर असो, प्रत्येक संकटात सापडलेल्यांच्या हाकेला माणुसकीच्या नात्याने धावणाऱ्या गणेश गल्लीत यंदा उज्जैनच्या धर्तीवर आकारास आलेल्या महाकाल मंदिरात मुंबईचा राजा विराजमान होत आहे.
सामाजिक बांधिलकीची जबाबदारी पार पाडत असताना समाजातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षणातही पुढे पाहिजे यासाठी कॉम्प्युटर क्लासेस सुरू करण्यात आले असून त्याचा हजारो विद्यार्थी लाभ घेत आहेत. समाजहित जपत असताना समाजाप्रति आपण काही देणं लागतो याची जाणीव ठेवत अत्याचार, अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या ९७ वर्षांपासून गणेश गल्लीच्या अर्थात मुंबईच्या राजाने समाजोपयोगी उपक्रम राबविले असल्याची माहिती गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांनी दैनिक 'नवशक्ति'शी बोलताना दिली. यंदाच्या गणेशोत्सवातही महिला अत्याचाराविरोधात, अंमली पदार्थाचे सेवन टाळणे, मुलांमध्ये शिक्षणाप्रति गोडी निर्माण व्हावी, असा सामाजिक हित जपणारा व लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणारा संदेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने स्वराज्य निर्मितीची चळवळ ही उत्सव माध्यमातून लोक जागृती व एकजूट करण्याची विचारधारणा लक्षात घेऊन विभागातील काही कार्यकर्त्यांनी सन १९२८ साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना पेरूची चाळ येथे केली. प्रथम हा उत्सव फक्त पाच दिवस या विभागात होत असे. भजने, कीर्तने, भारुड इत्यादी कार्यक्रम होत असत. या उत्सवामागे व्यापारी वर्गाने गिरणगावातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचे फार मोठे कार्य केले. पुढे मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे बाजार मोठा झाला आणि हा उत्सव तेजुकाया मेन्शन येथे स्थलांतरित करण्यात आला.
उत्सवाचे स्वरूप व त्याला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन त्याचबरोबर वाढत्या लोकवस्तीचे प्रमाण विचारात घेऊन कै. अंबाजी मास्तर व काही तडफदार उत्साही कार्यकर्त्यांनी १९३७-३८ साली हा उत्सव गणेशगल्ली परिसरात म्हणजेच आत्ता जेथे जागेचे देवस्थान आहे तेथे आणला. त्याच काळात हा श्री गणेश उत्सव अकरा दिवस साजरा करण्यास सुरुवात होऊन शारदामातेचा नवरात्रौत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. या उत्सवात वाडिया, चिंचपोकळी, काळाचौकी, करी रोड, जेरबाई रोड, मेघवाडीपासून संपूर्ण जुने लालबाग सहभागी होते. १९४२ साली या उत्सव कार्याला फार महत्त्व प्राप्त होऊन या उत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचे देखावे श्रींच्या पुढे ठेवण्यात येऊ लागले आणि उत्सव हा लोक जागृतीचे केंद्रस्थान झाला. त्यावेळी प्रमुख्याने स्वातंत्र्य चळवळीची भाषणे, करमणुकीद्वारे मेळे, नाटके, पोवाडे, इत्यादी लोकशिक्षणाचे कार्यक्रम उत्सवाद्वारे लोकांपुढे ठेवण्यात येऊ लागले. १९४५ साली सुभाषचंद्र बोस 'श्री' रूपाने स्वराज्याचा सूर्य सात घोड्यांचा देखावा स्थापून लोकांसमोर सादर करण्यात आला. त्यावर्षी लोकांचा प्रतिसाद पाहून ४५ दिवसांनी श्रींचे विसर्जन करण्यात आले, याचा मोठा बोलबाला संपूर्ण मुंबईमध्ये झाला होता. हा देखावा कै. राजापूरकर मूर्तिकार यांनी साकारला होता. सन १९४७ नंतर या उत्सवात स्वतंत्र भारत आणि विकास यांचे देखावे श्रींपुढे सादर करण्यात आले. महिलांवरील अत्याचार, मुली असुरक्षित, तरुण पिढी व्यसनाच्या आहारी, यामुळे गेल्या काही वर्षांत मुंबईचे चित्र बदलेल आहे. या गंभीर विषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक बांधिलकी जपणारा संदेश देण्यात येईल, असेही परब यांनी सांगितले.
असे उपक्रम राबवले जातात
> महारक्तदान शिबीर
> मोफत नेत्र तपासणी शिबीर
> मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया
> विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाटप
> संगणकीय कोर्सेस