
यंदा गणेशमूर्तींच्या उंचींचे बंधन नसल्याने मुंबईतील अनेक मंडळांनी उंच मूर्तींची स्थापना केली असून यामध्ये विशेष चर्चेत आला आहे तो खेतवाडीच्या ११व्या गल्लीतील मुंबईचा महाराजा. परशुराम रूपी असणाऱ्या ३८ फुटी या महाराजाने मुंबईतीलच नव्हे, तर राज्यातील गणेशमूर्तींच्या उंचीचे विक्रम मोडीत काढत सर्वात उंच बाप्पा म्हणून आघाडी मिळवली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’ने घेतली असून मंगळवारी सायंकाळी वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे विशेष प्रतिनिधी संजय नार्वेकर तसेच एचओडी विशेष प्रतिनिधी सुषमा नार्वेकर यांच्या हस्ते मंडळाला प्रमाणपत्र देण्यात आले. महाराष्ट्रात प्रथमच इतक्या उंचीची मूर्ती बनवण्यात आली असल्याचे संजय नार्वेकर यांनी सांगितले.
कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांत सर्वच सणांना बंधने आली होती. एकत्र येत सण साजरे करण्याला पूर्णपणे बंदी असल्याने आपसूकच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या सणांनादेखील नियमांचे चौकट पडले. अलीकडे काही महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व सणांसह गणेशोत्सवासाठीही निर्बंध हटवण्यात आले. मूर्तीच्या उंचीसाठीही कोणतीही अट ठेवण्यात आली नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या उत्साह शिगेला पोहोचला असून अनेक मंडळांनी मोठ्या, उंचच उंच मूर्तींची स्थापना केली आहे. या सर्व मंडळांमध्ये सर्वात उंच बाप्पा म्हणून गिरगाव खेतवाडीच्या ११व्या गल्लीतील मुंबईचा महाराजा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. परशुराम रूपी असणाऱ्या ३८ फुटी या महाराजाने मुंबईतीलच नव्हे, तर राज्यातील भक्तांची मने जिंकली आहेत.