
मुंबई : रुम खरेदी-विक्रीच्या व्यवहारात एका पोलीस शिपायाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रविण गजेंद्र कांबळे या मुख्य आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत तिघांचा सहभाग उघडकीस आला असून, त्यात गजेंद्र रघुनाथ कांबळेसह इतर दोघांचा समावेश आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत प्रविणला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असून, प्रविण हा त्यांचा लहानपणीचा मित्र आहे. त्याने त्याचा अंधेरीतील उपाध्याय नगर, हनुमान चाळीतील रुम विक्रीसाठी काढला होता. तक्रारदाराचे घर लहान असल्याने ते दुसऱ्या रुमच्या शोधात होते. ही माहिती प्रविणकडून समजताच त्याने त्याचाच एक रुम खरेदीचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात रुमच्या खरेदी-विक्रीचा पंधरा लाखांमध्ये सौदा झाला होता. त्यामुळे त्यांनी नोव्हेबर २०२० पर्यंत प्रविण, गजेंद्र यांच्या सांगण्यावरुन प्रविणची पत्नी रेश्मा संदीप बनसोडे हिच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते.