थेट मातोश्रीवर धडकणार मोर्चा ;धारावीसाठी भाजप-शिंदे गट देणार प्रत्युत्तर

१६ डिसेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावीपर्यंत मोर्चा काढला होता. या मोर्चाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला.
थेट मातोश्रीवर धडकणार मोर्चा ;धारावीसाठी भाजप-शिंदे गट देणार प्रत्युत्तर
PM

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी ग्रुपला दिले गेले आहे. एक-एक प्रकल्प अदानी ग्रुपच्या घशात घालण्याच्या सरकारच्या भूमिकेविरोधात ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत दि. १६ डिसेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावीपर्यंत मोर्चा काढला होता. या मोर्चाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. याविरोधात भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाले असून, हा मोर्चा विकासविरोधी असल्याची टीका केली होती. त्यातच आता भाजप आणि शिंदे गटाने जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे ठरविले असून, त्यासाठी थेट मातोश्रीवर मोर्चा धडकणार आहे.

मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात सातत्याने कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्यातच शिवसेनेत उभी फूट पडली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे मुंबईत ठाकरे गटाची चौफेर कोंडी करण्याचा डाव आखला जात आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली की, त्याला प्रत्युत्तर देण्याचा घाट घातला जात आहे. आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढताच आता भाजप आणि शिंदे गटाने जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी धारावी टी जंक्शन ते मातोश्री असा मोर्चा काढण्याचे ठरविले असून, लवकरच हा मोर्चा मातोश्रीवर धडकणार असल्याचे सांगण्यात आले.

धारावी पुनर्विकासाच्या कामात ठाकरे गट अडथळा आणत आहे. झोपडपट्टी भागाचा विकास ठाकरे गटाला खुपत आहे. त्यामुळे या विकास प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ठाकरे गटाला भाजप आणि शिवसेना शिंदे गट जशास तसे उत्तर देईल. असे सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ठाकरे गटाने सांताक्रुझ, वांद्रे, मुंबई परिसरातील पुनर्विकास संदर्भात का मोर्चे काढले नाहीत, असा सवाल उपस्थित केला. ठाकरे गटाच्या आक्रमक मोर्चाला आता शिंदे गट आणि भाजपसह मित्रपक्ष थेट आक्रमकपणे प्रत्युत्तर देत असल्याने हा वाद आता चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत.

धारावीला विरोध का?

धारावीचा विकास होत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आता विरोध का, धारावीच्या जवळ राहूनही यांना आजपर्यंत विकास साधता आला नाही. आता या भागाचा विकास होत असताना हे विरोध करीत आहेत. ठाकरे हे विकासविरोधी आहेत. कोणत्याही प्रकल्पाला ते आधी विरोध करतात, नंतर बोलून सेटलमेंट करतात, अशी यांची पद्धत असल्याचा आरोप करीत आधी अंबानी आणि आता अदानी ग्रुपला विरोध केला जात असल्याचा आरोपही पावसकर यांनी केला.थेट मातोश्रीवर धडकणार मोर्चा

logo
marathi.freepressjournal.in