मोठ्या घसरणीनंतर बाजार काही प्रमाणात सावरला;सेन्सेक्स ८६१ अंकांनी कोसळला

सोमवारी सकाळी सेन्सेक्स १४६६अंकांपर्यंत घसरला आणि ५७,३६७ अंकांवर उघडला.
मोठ्या घसरणीनंतर बाजार काही प्रमाणात सावरला;सेन्सेक्स ८६१ अंकांनी कोसळला

जागतिक बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांनंतर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय बाजारात मोठी घसरण झाली. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्याने दोन्ही निर्देशांक सोमवारी तब्बल १ टक्क्यांहून अधिक घसरले.

सोमवारी सकाळी सेन्सेक्स १४६६अंकांपर्यंत घसरला आणि ५७,३६७ अंकांवर उघडला. त्याचवेळी निफ्टीही घसरला आणि १७,२००चा स्तर गाठला होता. निफ्टी ३५८अंकांनी घसरला होता. त्यामुळे सोमवारीच सुरुवातीच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे ३.२३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. बाजार उघडताच सेन्सेक्स २.४९ टक्के घसरून ५७,३६७ अंकांवर आला. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल रु. ३,२३,१२३.५४ कोटींनी घसरून रु. २,७३,७२,९८८.०६ कोटींवर आले होते.

तथापि, व्यवहाराअखेरीस बीएसई सेन्सेक्स काही प्रमाणात सावरुन ८६१.२५ अंक किंवा १.४६ टक्के घसरुन ५७,९७२.६२वर बंद झाल. दिवसभरात तो १४६६.४ अंक किंवा २.४९ टक्के घसरुन ५७,३६७.४७पर्यंत घसरला होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २४६ अंक किंवा १.४ टक्के घसरुन १७,३१२.९०वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत टेक महिंद्राचा समभाग सर्वाधिक ४.५७ टक्के घसरला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा स्टील, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. तर हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती, नेस्ले, एशियन पेंटस‌्, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियोमध्ये घसरण तर शांघायमध्ये वाढ झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घट झाली होती. अमेरिकन बाजारात शुक्रवारी घसरण झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.७९ टक्का वधारुन प्रति बॅरलचा दर १०१.८ अमेरिकन डॉलर्स झाला.

जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.८६ टक्क्यानी वाढून १०१.८६ प्रति बॅरलवर व्यवहार करत होता. विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी ५१.१२ कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in