विश्वासदर्शक प्रस्‍तावाच्या वेळी दोन्ही बाजूंमध्ये सामना रंगणार

उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसनेच्या तर नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या पक्षादेशाची नोंद घेतली
 विश्वासदर्शक प्रस्‍तावाच्या वेळी दोन्ही बाजूंमध्ये सामना रंगणार

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील सामना आता रंगत जाणार आहे. विधानसभाध्यक्षपदाची पहिली लढाई शिंदे गट आणि भाजपने जिंकली आहे. आता सोमवारी सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्‍तावाच्या वेळी पुन्हा दोन्ही बाजूंमध्ये सामना रंगणार आहे. दरम्‍यान विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हीप झुगारल्‍याचे परस्‍पर विरोधी दावे शिवसेना आणि शिंदे गटाने रविवारी केले. पक्षादेश नाकारल्याने संबंधित आमदारांवर कारवाई करण्याची मागणी दोन्ही बाजूने करण्यात आली. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसनेच्या तर नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या पक्षादेशाची नोंद घेतली. त्यामुळे या मुद्द्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा कायदेशीर सामना होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी आज शिवसेनेच्यावतीने मुख्य प्रतोद सुनील प्रभू तर शिंदे गटाच्या वतीने भरत गोगावले यांनी पक्षादेश म्‍हणजेच व्हीप बजावला होता. अध्यक्ष निवडणुकीच्यावेळी शिंदे गटाच्या ३९ आमदारांनी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले. तर शिवसेनेच्या १६ आमदारांनी राजन साळवी यांना मतदान केले. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शिवसेनेच्यावतीने झिरवाळ यांना पक्षादेशाचे उल्लंघन झाल्याबाबत पत्र देण्यात आले. त्यावेळी झिरवाळ यांनी आपल्यासमोर पक्षादेशाचे उल्लंघन झाले असून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग झाल्याचे सांगून त्याची नोंद घेतल्याचे सांगितले.

त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिंदे गटाच्यावतीने त्यांना पत्र देण्यात आले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांना बजावलेला व्हीप १६ आमदारांनी मोडला. त्यांनी व्हीपच्या विरोधात मतदान केले असून आदित्य ठाकरे यांच्यासह या १६ आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

दरम्यान, आम्हीच अधिकृत शिवसेना विधिमंडळ पक्ष आहोत, असे दावे प्रतिदावे विधानसभेच्या नव्या अध्यक्षांकडे केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in