महाविकास आघाडीची २९ सप्टेंबरला बैठक होणार

शरद पवार यांच्या तसेच इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सरकार गेल्यानंतर होणारी ही पहिलीच बैठक असणार आहे
महाविकास आघाडीची २९ सप्टेंबरला बैठक होणार

महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक येत्या २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सरकार गेल्यानंतर आघाडीची ही पहिलीच महत्त्वाची बैठक असणार आहे. आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आघाडीची रणनीतीदेखील ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे ही बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानभवनात आघाडीची बैठक झाली होती; मात्र शरद पवार यांच्या तसेच इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सरकार गेल्यानंतर होणारी ही पहिलीच बैठक असणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडीसमोरील आव्हाने वाढली आहेत. एका बाजूला शिवसेना कमकुवत झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला शिंदे गट, भाजपकडून आपले मित्रपक्ष वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. मनसेला जवळ घेण्याची तयारी भाजपकडून जवळपास पूर्ण झाली आहे. मुंबई महापालिका ही आघाडी तसेच शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे. ही निवडणूक तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आघाडी करून लढायचे किंवा नाही, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. हा निर्णय झाल्यानंतरच पुढची रणनीती आखता येणे शक्य होणार आहे. या बैठकीत हा निर्णय होतो का हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

निवडणुकांसोबतच शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठीदेखील आघाडी एकत्र राहणे आवश्यक ठरणार आहे. सध्या तरी शिंदे-फडणवीस सरकार तसेच शिंदे गट शिवसेनेला आणि आघाडीला आक्रमकपणे तोंड देत आहे. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आघाडीला रणनीती ठरवावी लागणार आहे.

सोबत राहिलो तरच सरकारला तोंड देता येईल, याची जाणीव आघाडीतील नेत्यांना आहे. त्यामुळे या मुद्द्यावरदेखील या बैठकीत चर्चा होऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in