मुंबईत घामाच्या धारा; पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा 'ऑरेंज अलर्ट'

मागील दोन दिवस मुंबई, ठाण्यातील पारा अनुक्रमे ३९.७ व ४२ अंश सेल्सिअस असा उच्चांकी नोंदवला गेला. बुधवारी त्यात ३ ते ४ अंशांनी घट होत पारा ३५ अंशावर आला तरी आद्रतेमुळे अंगाची काहिली होत होती.
मुंबईत घामाच्या धारा; पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा 'ऑरेंज अलर्ट'
Published on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, रायगडच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे परिसरात सूर्य आग ओकत असून वाढत्या उष्णतेने व दमटपणामुळे मुंबईकर बुधवारी घामाच्या धारांनी चिंब भिजले. मंगळवारी मुंबईतील उष्णतेचा पारा ३९.७ अंश सेल्सिअसवर व ठाण्यात उच्चांकी ४२ अंशावर नोंदवला गेला होता. मात्र, बुधवारी यात घट होत पारा ३५ अंश सेल्सिअस नोंदवला गेला असला तरी दमटपणामुळे मुंबईकर चांगलेच घामाघूम झाले. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड येथे पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

मागील दोन दिवस मुंबई, ठाण्यातील पारा अनुक्रमे ३९.७ व ४२ अंश सेल्सिअस असा उच्चांकी नोंदवला गेला. बुधवारी त्यात ३ ते ४ अंशांनी घट होत पारा ३५ अंशावर आला तरी आद्रतेमुळे अंगाची काहिली होत होती. त्यामुळे बुधवारीही उकाड्याने लोक हैराण झाले. हवामान विभागाने मुंबई, ठाणेसह रायगड परिसरात १९ एप्रिलपर्यंत उष्णतेचा ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे.

डोक्यावर आग ओकणारा सूर्य, तापलेले रस्ते, लोकलमध्ये लागणाऱ्या उष्णतेच्या झळांनी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील नागरिक सध्या हैराण झाले आहेत. ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असून १९ एप्रिलनंतर ही स्थिती हळूहळू कमी होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.

logo
marathi.freepressjournal.in