मुंबई मेट्रो-३ पूर्णत्वाच्या मार्गावर

कुलाबा ते सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३मध्ये दरदिवशी १७ लाख प्रवाशांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी ६.५ मिनिटांनी ट्रेन चालवण्यात येतील तर बीकेसी ते कफ परेड या मार्गात ३.२ मिनिटांनी ट्रेन धावतील.
मुंबई मेट्रो-३ पूर्णत्वाच्या मार्गावर
Published on

कमल मिश्रा/मुंबई

मुंबईच्या शहरी पायाभूत सोयीसुविधांसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या तसेच बहुप्रतीक्षित असलेला मुंबई मेट्रो-३ प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गाव असून लवकरच हा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. हा प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात आला असून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता चाचण्या आणि विविध प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी वेगाने कामे सुरू असून पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी हा मार्ग सेवेत येण्याची वाट प्रवासी आतुरतेने पाहत आहेत.

मेट्रो-३ मार्गाच्या विविध चाचण्या सुरू असून प्रकल्पाचे काम ९० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. “मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मेट्रो मार्ग टरणार असून लाखो प्रवाशांना दळ‌णवळणाच्या उत्तमोत्तम सोयीसुविधा आणि सुलभता प्राप्त करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. हा प्रकल्प पूर्णपणे सुरू झाल्यास, रस्त्यावरील वाहतूक कमी होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, तसेच मुंबईच्या शहरी वाहतूकीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा हा मार्ग असेल,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या मार्गाविषयी सविस्तर माहिती विचारले असता, अधिकाऱ्याने सांगितले की, “कुलाबा ते सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३साठी आम्हाला ३१ ट्रेनची (रेक्स) आवश्यकता आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी आम्हाला ९ ट्रेनची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत, एमएमआरसीकडे आठ कोच असलेल्या १७ ट्रेन उपलब्ध आहेत.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)च्या पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, “पुढील काही महिन्यांत आरे ते बीकेसी हा मार्ग प्रवासी सेवेसाठी उपलब्ध असेल. दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते कफ परेड हा मार्ग पहिला टप्पा सुरू झाल्याच्या सहा महिन्यांनंतर प्रवासी सेवेत आणण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्याच्या मार्गासाठी ट्रेनच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. १२.४४ किमी.च्या या पहिल्या टप्प्यात १० स्थानके प्रस्तावित असून त्यापैकी ९ भूमिगत स्थानके तसेच आरे येथे एक ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहे.”

“ट्रेनच्या विविध चाचण्या आणि कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा प्रवाशांकरिता सुरू करण्यात येईल. त्यामुळे मुंबईतील वाहतूकीला एक वेगळा आयाम मिळेल. त्यानंतर बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला अधिक गती देता येईल,” असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, सध्या बीकेसी आणि आरेदरम्यान ट्रायल रन जोरात सुरू आहेत. सिग्नल टेलिकम्युनिकेशन, रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक ट्रॅक्शन यासह विविध प्रणालींचे प्रमाणीकरण केले जात आहे. या कठोर चाचण्या प्रवासी सेवा सुरू होण्यापूर्वी कडक सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करतात. या मार्गावर तिकीट भाडे किती असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दररोज १७ लाख प्रवाशांचे उद्दिष्ट

कुलाबा ते सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३मध्ये दरदिवशी १७ लाख प्रवाशांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी ६.५ मिनिटांनी ट्रेन चालवण्यात येतील तर बीकेसी ते कफ परेड या मार्गात ३.२ मिनिटांनी ट्रेन धावतील. प्रत्येक फेरीमध्ये २५०० प्रवासी एका वेळेला प्रवास करतील. त्याचबरोबर नरीमन पॉइंट, कफ परेड, फोर्ट, लोअर परेल, बीकेसी आणि सीप्झ/एमआयडीसी या सहा महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती किंवा कामगारांची संख्या सर्वाधिक असलेल्या ठिकाणी मेट्रो-३मधून जाणे सहज शक्य होईल. त्याचबरोबर या मेट्रो-३ मार्गाचा फायदा ३० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था, १३ हॉस्पिटल, १४ धार्मिक स्थळे किंवा ३०पेक्षा जास्त मनोरंजन ठिकाणे असलेल्या जागी जाण्यास होईल.

logo
marathi.freepressjournal.in