‘मुंबई आय’ प्रकल्प वांद्रे येथून हलवणार

‘मुंबई आय’ प्रकल्प वांद्रे येथून हलवणार

अतिक शेख/मुंबई

वांद्रे रेक्लेमेशन येथील प्रस्तावित ‘मुंबई आय’ प्रकल्प स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. महिनाभरापूर्वीच वांद्रे रेक्लेमेशन येथे जायंट ऑब्झर्व्हेशन व्हील प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीसाठी निविदा मागवली आहे. त्यात आता सुधारणा करण्यात येणार आहे.

मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच पर्यटनवाढीला चालना मिळावी या उद्देशाने ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’या प्रकल्पाची एमएमआरडीएने घोषणा केली होती. वांद्रे रेक्लेमेशन येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. सुमारे १५० व्यासाच्या ‘मुंबई आय’ नावाचा उंच टॉवरच्या माध्यमातून पर्यटकांना मुंबईचे विहंगम दृश्य घडवण्याची ही योजना आहे. याकरिता अंदाजे २००० कोटी खर्च अपेक्षित आहे. परंतु या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह वांद्रे येथील भाजपचे आमदार आशिष शेलार यांचाही विरोध आहे.

या प्रकल्पामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होईल, येथील शांतता भंग पावली जाईल, तसेच पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण होईल, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रकल्प इतरत्र नेण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. एमएमआरडीएने वेगळ्या सल्लागारांद्वारे मुंबई आय प्रकल्पासाठी योग्य जागा निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे हा प्रकल्प आणखी काही महिने लांबणीवर पडणार आहे.

पोर्ट ट्रस्टच्या जागेवर प्रकल्प न्या!

‘मुंबई आय’ हा प्रकल्प एमएमआरडीएने मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर-मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर हलवावा, सध्या ही जागा खुली करण्याच्या दृष्टीने सरकार योजना आखत आहे.

- आशिष शेलार, भाजप आमदार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in