
मुंबई : मुंबई महापालिका आणि काही सामाजिक संस्था यांच्या मदतीने सुमारे ७० टक्क्यांहून अधिक भटक्या कुत्र्यांचे नसबंदी करण्यात पालिकेला यश आले आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कारवाई केली जाते, अशी माहिती पालिका अधिकारी डॉ कालिमपाशा पठाण यांनी दिली.
आतापर्यंत मुंबई महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या वतीने गेल्या नऊ वर्षात १ लाख ४८ हजार ८४ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. तर २ लाख १६ हजार ४३३ कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर रेबीजची लागण झालेल्या कुत्र्यांमुळे अन्य कुत्रे रेबीजला बाळी पडू नये यासाठी त्यांना जीवे मारण्यात येते. अशी माहिती पालिका कर्मचारी यांनी दिली.
भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ला करून जखमी केले जाते. तेव्हा उपद्रव माजविणाऱ्या भटक्या कुत्र्यांची तक्रार पालिकेच्या श्वान प्रतिबंधक विभागाकडे करण्यात येते. या तक्रारी धारावी, चेंबूर, कुर्ला, सातरस्ता, मुलुंड, मालाड आणि वांद्रे येथील श्वान प्रतिबंधक विभागाकडे थेट दाखल करता येतात. त्यानंतर पालिकेचे श्वान प्रतिबंधक पथक संबंधित ठिकाणी जाऊन कुत्र्यांना पकडून आणतात.
लसीकरण, नसबंदी केलेल्या श्वानांच्या कानावर व्ही कट
विभागातून भटक्या कुत्र्यांसंबंधी तक्रार दाखल झाल्यानंतर पालिकेचे कर्मचारी आणि पथक गाडी घेऊन संबंधित ठिकाणी जाते. कुत्र्याला पकडून बैल घोडा, परळ किंवा शिवडी येथे प्राणी रुग्णालयात दाखल केले जाते. त्याची नसबंदी करून त्याच्यावर पंधरा दिवस उपचार केले जातात. त्यानंतर संबंधित कुत्र्याला त्याच विभागात पुन्हा सोडण्यात येते. काहीही झाले तरी कुत्र्याचा विभाग बदलला जात नाही. कुत्र्यांचे लसीकरण अथवा नसबंदी झाली आहे, अशा कुत्र्यांच्या कानावर व्हीं आकाराचा कट केला जातो, अशी माहिती पालिका कर्मचारी यांनी दिली.