ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा

मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील मोकळ्या जागेवर असेलेल्या ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली आहे
ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा
Published on

मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील मोकळ्या जागेवर असेलेल्या ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालवर महापालिकेने कारवाई केली आहे. ठाकरे गटाकडून अनधिकृतपणे बांधण्यात आलेलं हे कार्यालय पाडण्यात येत आहे. ठाकरे गटाने कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्याठिकाणी बोर्ड लावलं होतं, तसंच कार्यालय देखील बांधण्यात आलं होतं. आज त्यावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे.

वांद्रे पूर्व भागातील मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या या कार्यालयावर महापालिकेने तोडक कारवाई केली आहे. यावेळी महापालिकेपासून सुरु असलेल्या कारवाईला ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याकडून विरोध होत होता. मात्र, बीएमसी'ची पूर्वपरवानगी न घेता तसंच कोणतीही विचारणा न करता हे कार्यालय उभारण्यात आल्याचं महापालिकेकडून कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं. यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून पोलीसांच्या कडेकोट बंदोस्तात ही कारवाई करण्यात आली.

यावर महापालिकेची कारवाई अन्यायकारक असल्याचं ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे. हे कार्यालय पोलीस स्टेशनच्या समोर असून ते काही आज बांधण्यात आलेले नाही. कागदपत्र सादर करण्यासाठी नोटीस द्यायला हवी होती. पण एकाएकी तोडफोड? हे वैरभावनेचे द्योतक असल्याची टिका त्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in