
पावसाळा सुरू होताच मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण होते; मात्र खड्डा पडल्याची तक्रार मिळताच २४ तासांत बुजवण्यात येतो, असे पालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात येते. ९ ते २५ जुलैपर्यंत तब्बल १० हजार रस्ते खड्डेमुक्त झाल्याचा दावा रस्ते विभागाने केला आहे. दरम्यान, १ एप्रिल ते २५ जुलैपर्यंत तब्बल १८ हजार खड्डे बुजवण्यात आल्याचे रस्ते विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, अजूनही अनेक ठिकाणी खड्डे असल्याने वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते, अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
जुलै महिन्यात जोरदार पावसात ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुंबई शहर व उपनगरांत अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते आहे. दरवर्षीची ही समस्या यंदाही कायम आहे. खड्डे भरण्यासाठी पालिकेकडून कोल्डमिक्सचा वापर केला जातो, तर रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी चार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. गेल्या १० दिवसांपासून पावसानेही उसंत घेतल्याने खड्डे भरण्यासाठी पालिकेचे काम वेगाने सुरू झाले आहे.