बूस्टर लसीकरणासाठी पालिका घरोघरी जाऊन जनजागृती करणार

पहिल्या आणि शेवटच्या चार दिवसांच्या अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर लसीकरणात घट दिसून आली
बूस्टर लसीकरणासाठी पालिका घरोघरी जाऊन जनजागृती करणार
Published on

केंद्र सरकारने १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांच्या मोफत बूस्टर लसीकरणासाठी सुरू केलेल्या ७५ दिवसांच्या मोहिमेला आशादायी सुरुवात झाली; मात्र जवळपास १० दिवसांनी या मोहिमेला धीमा प्रतिसाद मिळत आहे. मोहीम सुरू होऊन दोन आठवडे उलटायला आले तरी लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोस घेणाऱ्या लाभार्थींची संख्या कमी दिसत आहे. परिणामी, पालिका आता घरोघरी जाऊन लसीबाबत जनजागृती करणार आहे. त्याची जबाबदारी परिसरातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर सोपवली जाईल.

पहिल्या आणि शेवटच्या चार दिवसांच्या अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर लसीकरणात घट दिसून आली. कमी लसीकरण केंद्रे, पालिकेकडून न दिली जाणारी माहिती, शिक्षण आणि संप्रेषणाचा अभाव आणि कोविड रुग्णांमध्ये झालेली घट, ही याची प्रमुख कारणे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१५ जुलैपासून मुंबईसह राज्यात ‘कोविड लस अमृतमहोत्सव’ सुरू झाला. पालिका आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या लसीकरण अहवालानुसार आठ दिवसांत १८ ते ५९ वयोगटातील ७४ हजार ५७१ लाभार्थींना पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांमधून बूस्टर डोस देण्यात आला. मुंबईत दररोज ९,३२१ लाभार्थी बूस्टर डोस मोफत घेत आहेत. सुरुवातीला त्याची संख्या १२ हजारांहून अधिक होती. त्यावरून दिवसेंदिवस मोफत बूस्टर डोस घेणाऱ्या लाभार्थींची संख्या कमी होत असल्याचे स्पष्ट होते.

logo
marathi.freepressjournal.in