वानखेडेंवर अनियमिततेचे गंभीर आरोप, चौकशी आवश्यक! एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा

वानखेडेंवर अनियमिततेचे गंभीर आरोप, चौकशी आवश्यक! एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण तसेच अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन नागरिकावर कारवाई केल्याप्रकरणी एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची एनसीबीने प्राथमिक चौकशी सुरू केली होती.

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी एनसीबीच्या नोटिसांमुळे मेटाकुटीला आलेले एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात अनियमिततेचे गंभीर आरोप असून त्यांची चौकशी करणे गरजेची असल्याचा दावा एनसीबीने गुरुवारी मुंबई हायकोर्टात केला. तसे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सूडाच्या भावनेने ही चौकशी करण्यात येत असल्याचा दावाही एनसीबीने फेटाळून लावला आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण तसेच अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन नागरिकावर कारवाई केल्याप्रकरणी एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची एनसीबीने प्राथमिक चौकशी सुरू केली होती. नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत एनसीबीने वानखेडे यांना आठ नोटिसा बजावल्या तसेच चौकशी करणाऱ्या एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले. त्या विरोधात वानखेडे यांनी अ‍ॅड. राजीव चव्हाण यांच्यामार्फत याचिका दाखल करून चौकशी आणि त्यांना बजावलेल्या नोटिसांना आव्हान देणारी याचिका नव्याने दाखल केली आहे. वानखेडे यांनी ‘आपल्याला सूडबुद्धीने या प्रकरणात टार्गेट केले जात असून आपल्यावर सूड उगवण्यासाठी ही चौकशी केली जात असल्याचा’ दावा याचिकेत केला आहे.

एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांनी या याचिकेत जोरदार विरोध केला आहे. वानखेडे हे त्यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या चौकशीला विलंब करत आहेत. जानेवारी २०२४ साली अभिनेत्री सपना पब्बी हिने एनसीबीकडे तक्रार केली होती व दावा केला की तिच्याविरुद्ध जारी केलेले लूकआऊट परिपत्रक कोणतेही कारण नसताना प्रलंबित ठेवण्यात आले होते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात वानखेडे यांच्या कार्यकाळात एनसीबीने बेकायदेशीरपणे मुंबईतील निवासस्थानाची झडती घेतली होती, या सर्व प्रकरणाची चौकशी गरजेचे असल्याचे एनसीबीने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in