कुर्ला येथे मलनि:स्सारण वाहिन्यांचे जाळे विस्तारणार

पालिका ७ कोटी रुपये खर्चणार
कुर्ला येथे मलनि:स्सारण वाहिन्यांचे जाळे विस्तारणार
Published on

मुंबई : मुंबई मलजल मुक्तीसाठी मुंबई महापालिकेने नव्याने मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कुर्ला पूर्व येथील व्ही. एन. पुरव मार्ग आणि चुनाभट्टी येथील वसंतराव नाईक मार्ग जंक्शनपासून ते राहुल नगर नालापर्यंत ४०० मि.मी. व्यासाची मलनि:स्सारण वाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात मलनि:स्सारण वाहिनी अभावी शौचालयांचा जो मल टाकीत अथवा उघड्या नाल्यांमध्ये सोडला जात होता, तो आता मलवाहिनीद्वारे वाहून नेला जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ७ कोटी ६८ लाख रुपये खर्चणार आहे.

मुंबई महापालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पांतर्गत कुर्ला पूर्व येथील व्ही.एन. पुरव मार्ग व चुनाभट्टीतील वसंतराव नाईक मार्ग, राहुल नगर आदी भागांमध्ये जिथे मलवाहिन्यांचे जाळे नाही, तिथे आता मलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी व्ही. एन. पुरव मार्गासह नाईक मार्गवर मलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी व्ही. एन. पुरव मार्गासह नाईक मार्ग जंक्शन ते राहुल नगर नालापर्यंत मलवाहिनी टाकल्यामुळे या सभोवतालच्या परिसरातील मलनि:स्सारण समस्येचे निराकरण होईल तसेच या मलवाहिनी व्यवस्थेचा लाभही त्यांना मिळेल आणि पर्यायाने येथील नागरिकांचे दैनंदिन जनजीवन आरोग्यदायी बनण्यास मदत होईल, असा विश्वास मलनि:स्सारण प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जुलै २०१९मध्ये मुंबई क्षेत्रात महापालिकेला कालबद्ध पद्धतीने मलनि:स्सारण वाहिन्यांचे जाळे वाढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले असून या कामाच्या प्रगतीचे अवलोकन करण्याचे निर्देशही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने मलवाहिन्यांचे जाळे अधिक वाढवण्याच्या कामाला गती दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in