अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींना एनआयए’ने अटक केली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींना एनआयए’ने अटक केली

काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या घरासह अन्य ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईनंतर आता दाऊद टोळीशी संबंधित दोघांना ‘एनआयए’ने अटक केली आहे. त्यात आरिफ अबूबकर शेख आणि शब्बीर अबूबकर शेख या दोघांचा समावेश असून अटकेनंतर या दोघांना विशेष सेशन कोर्टाने २० मेपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेने एनआयएने दाऊद इब्राहिम व त्याच्या साथीदारांविरुद्ध धडक कारवाईला सुरुवात केली असून त्याचे अनेक साथीदार भूमिगत झाले आहेत. दुसरीकडे शेख यांच्या अटकेने दाऊदसह छोटा शकीलला जबरदस्त हादरा बसल्याचे बोलले जाते.

सोमवारी ९ मे रोजी एनआयएच्या एका विशेष पथकाने दाऊद इब्राहिमशी संबंधित नातेवाईक, त्याच्या सहकाऱ्यांच्या मुंबई आणि ठाण्यातील २९ ठिकाणी अचानक छापे टाकले होते. या छाप्यात या अधिकाऱ्यांना अनेक धक्कादायक कागदपत्रांसह इलेक्ट्रॉनिक दस्तावेज, कॅश आणि घातक शस्त्रसाठा सापडला होता. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतल्यांनतर या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. चौकशीदरम्यान आरिफ आणि शब्बीर यांचे नाव समोर आले होते. ते दोघेही अंधेरीतील ओशिवारा परिसरात राहत होते. त्यामुळे या दोघांना गुरुवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

ते दोघेही दाऊद आणि छोटा शकीलचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जात असून ते त्यांच्या संपर्कात असल्याचा संशय या अधिकाऱ्यांना आहे. दाऊद इब्राहिमने आगामी काळात काही राजकीय नेत्यांसह व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी टोळीकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकासह घातक शस्त्रांची जमवाजमव सुरु केली होती. दाऊद इब्राहिमने या हत्येसह मुंबई, दिल्लीत मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याचा कट रचल्याचेही आतापर्यंतच्या चौकशीतून उघडकीस आले होते. या माहितीनंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दाऊदशी संबंधित व्यक्तींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या कारवाईमुळे दाऊदसह छोटा शकीलला जबदस्त हादरा बसल्याचे बोलले जाते. दाऊद आणि छोटा शकीलशी संबंधित आणि त्यांच्या संपर्कात राहून खंडणी वसुली, ड्रग्ज तस्करी आणि हवालाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेले अनेक सहकारी पळून गेले आहेत. अटकेच्या भीतीने ते सर्वजण अंडरग्राऊंड झाल्याचे बोलले जाते. सोमवारी एनआयएच्या कारवाईनंतर काहींना या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात छोटा शकीलचा साडू सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट, बिल्डर अजय गोसालिया, गुड्डू पठाण, कय्युम शेखसह अठराजणांचा समावेश होता. या सर्वांच्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासे झाले होते.

त्यात शब्बीर आणि आरिफने अनेक धक्कादायक माहिती एनआयए अधिकाऱ्यांना दिली होती. या दोघांनी दाऊदसाठी मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली केली असून हा पैसा दहशतवादी कारवायासाठी पाठविल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना गुरुवारी या गुन्ह्यांत अटक करण्यात आली. त्यांना आठ दिवसांची एनआयए कोठडी मिळाल्यामुळे त्यांची आता एनआयएकडून कसून चौकशी होणार आहे. आगामी दिवसांत दाऊदशी संबंधित आणखी काही जण एनआयएच्या रडारवर असून काही टीम वेगवेगळ्या शहरात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in