
मुंबई : मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू आदी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा झपाट्याने फैलाव होत आहे. ३ ते १० सप्टेंबर या सात दिवसांच्या कालावधीत मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांत तिपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पावसाची धुवांधार बॅटिंग होत नसली तरी पावसाळी साथीच्या आजारांचे टेन्शन कायम आहे. दरम्यान, मलेरियाच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या अॅनोफिलीस व डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस डासांच्या उत्पत्ती स्थानांकडे दुर्लक्ष करणाऱ्या १४ हजार ३८५ विविध आस्थापना व कार्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर १,२४२ जणांना न्यायालयात खेचल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जून महिना कोरडा गेला, जुलै महिन्यात वरुणराजा बरसला, ऑगस्ट महिन्यात वरुणराजाची अवकृपा तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस बरसला. मात्र पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होतच आहे. १ ते ३ सप्टेंबरच्या तुलनेत ३ ते १० सप्टेंबरपर्यंत मलेरियाच्या रुग्णसंख्येत ३३३, तर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ३१८ ने वाढ झाल्याने साथीच्या आजारांनी मुंबई तापली आहे. १ ते १० सप्टेंबरपर्यंत मलेरियाचे ३९०, डेंग्यूचे ३५०, गॅस्ट्रोचे १९२, लेप्टोचे ३२, कावीळीचे २३, चिकनगुनियाचे १० व स्वाईन फ्लूचे ५ अशा रुग्णांचे निदान झाल्याने मुंबईत पावसाळी आजारांचा धोका वाढला आहे.
मलेरियाच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या अॅनोफिलीस व डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांच्या उत्पत्ती स्थानांकडे दुर्लक्ष करणे पडले भारी, असे म्हटले जात आहे.
जानेवारी ते ३१ ऑगस्टपर्यंत अशी झाली कारवाई!
एकूण १४,३८५ आस्थापना व कार्यालयांना नोटीस
१,२४२ जणांना न्यायालयात खेचले
दंडात्मक कारवाई - १९ लाख ७०० रुपये