लष्कर-ए-तोयबाच्या तिसऱ्या संशयिताला उत्तर प्रदेशातून केली अटक

इमामुलच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या अतिरेक्यांची संख्या आता तीन झाली आहे
लष्कर-ए-तोयबाच्या तिसऱ्या संशयिताला उत्तर प्रदेशातून केली अटक

लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित तिसऱ्या संशयित अतिरेक्याला उत्तर प्रदेशातून महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. इमामुल हक उर्फ अमामुल इम्तियाज असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला कोर्टाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इमामुलच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या अतिरेक्यांची संख्या आता तीन झाली आहे.

यापूर्वी याच गुन्ह्यांत आफ्ताब हुसैन शहा आणि मोहम्मद जुनैद मोहम्मद आफ्ताब हुसैन या दोघांना एटीएसने अटक केली होती. गेल्या महिन्यात चार संशयित अतिरेक्यांविरुद्ध काळाचौकी एटीएसने गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पुण्यातून जुनैद मोहम्मद याला या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. तो बंदी घातलेल्या ‘लष्कर-ए-तोयबा’ या अतिरेकी संघटनेचा अतिरेकी असून, त्याने मोठ्या प्रमाणात देशविघातक कारवाया करण्याची योजना बनविली होती. त्याच्या चौकशीतून आफ्ताब याचे नाव समोर आले होते. आफ्ताब हा काश्मीरच्या किश्तवार परिसरात राहत असल्याने महाराष्ट्र एटीएसचे एक विशेष पथक काश्मीरला गेले होते. यावेळी पथकाने श्रीनगर येथून २११ किमी अंतरावर असलेल्या किश्तवार येथून आफ्ताब शहा या २८ वर्षांच्या संशयित अतिरेक्याला अटक केली होती.

या दोघांनी त्यांच्या तिसऱ्या सहकाऱ्याचे नाव सांगितले होते. इमामुल हक असे या संशयिताचे नाव असून तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात होता. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याचा ताबा महाराष्ट्र एटीएसला देण्यात आला आहे. जुनैदच्या सांगण्यावरून इमामुल या संघटनेत सामील झाला होता. त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात देशविघातक कारवाया केल्याच्या काही गुन्ह्यांची नोंद होती. जुनैदने देशातील काही प्रमुख शहरामध्ये घातपात घडविण्याचा कट रचला होता, त्यांच्या बँक खात्यात काही पैसे जमा झाले होते. या पैशांच्या मदतीने जुनैदने अनेकांना संघटनेत सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याने आतापर्यंत किती तरुणांची माथी भडकावून संघटनेत सामील करून घेतले आहे, याचा आता पोलीस तपास करीत आहेत. इमामुलची सध्या पुणे एटीएसकडून चौकशी सुरू असून, या चौकशीचा तपशील समजू शकला नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in