मुंबईत घरनोकरांकडून चोरीचे प्रमाण वाढले

ज्याच्यावर विश्वासाने घराची जबाबदारी द्यायची, त्यानेच विश्वासघात करावा, असे प्रकार मुंबईत वाढू लागले आहेत.
मुंबईत घरनोकरांकडून चोरीचे प्रमाण वाढले

मेघा कुचिक/मुंबई

ज्याच्यावर विश्वासाने घराची जबाबदारी द्यायची, त्यानेच विश्वासघात करावा, असे प्रकार मुंबईत वाढू लागले आहेत. मुंबईत घरात काम करणाऱ्या नोकरांकडून चोरीचे प्रमाण वाढू लागल्याचे दिसत आहे.

खार येथे एका घरात काम करणाऱ्या दोन नोकरांनी घरातील सर्वांना बेशुद्ध करून ५० लाख रुपये किमतीचे दागिने पळवून नेले. वर्सोवा येथील नोकराने पैसे व दागिने लांबल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.

गोरेगावची घटना अधिक धक्कादायक आहे. एका उद्योगपतीने आपल्या मित्राला धार्मिक कामासाठी घरी बोलवले होते. या कार्यक्रमानंतर तो मित्र दुबईला निघाला. त्याने बॅग तपासली तेव्हा त्यातून परकीय चलन गायब होते. उद्योगपतीने तातडीने पोलिसांकडे तक्रार केली. नोकर राकेश पासवान याच्याकडून तत्काळ हे १५ लाख रुपयांचे परकीय चलन ताब्यात घेतले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक वैष्णव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांनी पासवान याला अटक केली.

वर्सोवा येथे परदेशी महिला व तिची बहीण दातांच्या ट्रिटमेंटसाठी शहरात आली. तिच्या बॅगेतील पासपोर्ट, पैसे व ज्वेलरी गहाण झाले. या प्रकरणात तिचा नोकर छोटू याच्यावर प्राथमिक संशय होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार व उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी नोकर छोटू याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेली बॅग ताब्यात घेतली. त्याला कमी श्रमात झटपट श्रीमंत व्हायचे होते.

घरोघरी कामाला पाठवणाऱ्या अनेक एजन्सीनी सांगितले की, आम्ही नोकराचे आधार, पॅन कार्ड, लाईट बिल, फोटो, दोन ओळखीच्या व्यक्तीचे रेफरन्स, कुटुंबीयांचे फोन क्रमांक घेतो. आता पोलिसांचे व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. मुंबई हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश दरेकर म्हणाले की, पुरेशी चौकशी न करता नोकरांना कामावर ठेवले जाते. कोणाच्या तरी शब्दावर अवलंबून राहण्यापेक्षा कामावर ठेवणाऱ्या नोकरांची आवश्यक ती कागदपत्रे जमा करावीत.

logo
marathi.freepressjournal.in