मुंबई : दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरात ये-जा करण्यासाठी, विशेषत: वाहन चालकांसाठी महत्त्वपूर्ण असलेला सायन स्थानकातील ११० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर पुलाचे काम हाती घेण्यात येणार असून जुना पूल पाडून नवीन पुलाची पुनर्बांधणी तसेच पाचव्या व सहाव्या लेनचे काम हाती घेण्यात येणार आहे. मात्र सायन स्थानकातील रोड ओव्हरपूल महत्त्वपूर्ण असल्याने पुढील दीड वर्षे मुंबईत वाहतूककोंडीची समस्या निर्माण होणार आहे.
शीव रेल्वे रोड ओव्हरपूल नसल्याने होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पालिका वाहतुकीचे नियोजन करणे, बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक लावणे या कामासाठी १४ कोटींचा खर्चही करणार आहे. शीव पुलाच्या कामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाली आहे.
असे होणार काम
शीव रेल्वेवरील रोड ओव्हरपूल सद्यस्थितीत ४० मीटर लांब आहे. तो ५१ मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. अहवालानुसार हा पूल दोन स्पॅनवर असून त्याचा एक खांब रेल्वे मार्गावर आहे. नवीन पूल एकाच स्पॅनवर असेल आणि रेल्वे मार्गावर खांब नसेल.
मध्य रेल्वेने पालिकेच्या समन्वयाने या पुलाची पुनर्बांधणी व नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रोड ओव्हरपूल बांधणीसाठी मध्य रेल्वे २३ कोटी रुपये तर नवीन रस्ता बांधण्यासाठी मुंबई महापालिका २६ कोटी रुपये खर्च करणार आहे.