ऑरेंज गेट ते ग्रँट रोड उन्नत मार्ग महागला; ६३८ कोटींचा खर्च गेला १,१७० कोटींवर

५.६ किलोमीटर लांब उन्नत मार्ग बांधण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून याआधी ६३८ कोटींचा खर्च अपेक्षित असताना नव्याने मागवण्यात आलेल्या निविदेनुसार हा खर्च १,१७० कोटींवर गेला आहे.
ऑरेंज गेट ते ग्रँट रोड उन्नत मार्ग महागला;
६३८ कोटींचा खर्च गेला १,१७० कोटींवर

मुंबई : ऑरेंज गेट ते ग्रँट रोड उन्नत मार्गाचे काम सुरू होण्याआधीच महागला आहे. ऑरेंज गेट ते ग्रँट रोड दरम्यान ५.६ किलोमीटर लांब उन्नत मार्ग बांधण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून याआधी ६३८ कोटींचा खर्च अपेक्षित असताना नव्याने मागवण्यात आलेल्या निविदेनुसार हा खर्च १,१७० कोटींवर गेला आहे. दरम्यान, उन्नत मार्गात काही तांत्रिक कारणे समोर आली असून आधी हँकॉक पुलाचा काही भाग केबल आधारित होऊ शकतो, हे लक्षात आले. तसेच उन्नत मार्गांत जमिनीखाली युटिलिटीजचा विचार केला नव्हता. परंतु नव्याने मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत युटिलिटीजचा विचार करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

ईस्टन फ्रीवेवरून वेस्टर्न वेला जोडण्यासाठी मुंबई महापालिकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यावेळी ऑरेंज गेट ते ग्रँट रोड दरम्यान उन्नत मार्ग बांधण्यासाठी ६३८ कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. हा एलिव्हेटेड ब्रिज जेजे पुलाच्या लांबीपेक्षा मोठा असून ५.५६ किलोमीटर लांबीचा असणार आहे. परंतु ऑगस्ट २०२३ मध्ये मुंबई महापालिकेने उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया रद्द केली. मात्र आता पुन्हा एकदा पाच महिन्यांनंतर निविदा मागवल्या असून या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये अतिरिक्त खर्च अपेक्षित असल्याने खर्च ६३८ कोटीवरून १,१७० कोटींवर गेला आहे.

या मार्गावरील वाहतूककोंडी फुटणार!

डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डिमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग, ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या भागातील; म्हणजेच दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत व अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in