
लाडक्या बाप्पाचे आगमन तीन दिवसांनी होणार असून, गणपती मार्गस्थ होणाऱ्या रस्त्यांवर पालिकेचे विशेष लक्ष आहे. गणेशोत्सव मंडळात बाप्पाचे आगमन झाले असून बुधवार, ३१ ऑगस्ट रोजी घरगुती मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे; मात्र बाप्पाच्या मिरवणुकीतील खड्ड्यांचे विघ्न दूर होणार आहे.
गोदरेज व अल्ट्रा ट्रॅक कंपनीच्या स्पेशल सिमेंटचा वापर केला जात आहे. त्यामुळे मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे भरण्यासाठी पालिकेने ‘रॅपिड क्युरिंग काँक्रीट’चा वापर सुरू केला असून रॅपिड क्युरिंग अस्फाल्ट’चा वापर करणार आहे. दरम्यान, रॅपिड क्युरिंग काँक्रीटचा वापर खड्डे बुजवण्यासाठी केल्यानंतर चार तास त्या खड्ड्यांवरून वाहतूक बंद करण्यात येते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर रात्रीचा करण्यात येतो, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली.
प्रत्यक्ष क्षेत्रीय आढावा घेण्यासाठी अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आर-उत्तर, पी-उत्तर, पी-दक्षिण, के-पश्चिम, आणि एच-पूर्व विभागांमध्ये रॅपिड हार्डनिंग काँक्रीट पद्धतीने भरलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. बाप्पाच्या आगमनापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी शहर व दोन्ही उपनगरांत सात कोटींच्या निविदा मागवल्या होत्या; मात्र निविदा प्रक्रियेस प्रतिसाद न मिळाल्याने त्या रद्द करण्यात आल्या आहेत. गणपती मार्गस्थ होणाऱ्या रस्त्यांवर खड्डे बुजवणे हे लक्ष केंद्रित करत पालिकेच्या वॉर्ड स्तरावरील कंत्राटदारांना खड्डे बुजवण्याचे कंत्राट देण्यात आल्याचे वेलरासू यांनी सांगितले.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत राहून साजरा करावा लागला होता; मात्र यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असून खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार गणपती मार्गस्थ होणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.