‘मविआ’त संशयकल्लोळ’ नाट्य रंगले,बंडानंतर बेदिली माजण्याची चिन्हे

शरद पवारांनी ‘आता ही लढाई विधानसभेच्याच प्रांगणात होईल’, असा इशारा देत बंडखोरांचे नीतीधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला
‘मविआ’त संशयकल्लोळ’ नाट्य रंगले,बंडानंतर  बेदिली माजण्याची चिन्हे
Published on

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप व संशयकल्लोळ निर्माण झाला असून बेदिली माजण्याची चिन्हे दिसत आहेत. याची सुरुवात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याने झाली. त्यांनी शिंदे यांच्यासह गुवाहाटीला गेलेल्या शिवसेनेच्या ३७ हून अधिक आमदारांना परत येण्याचे आवाहन करतानाच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दाखवली. त्यामुळे ‘मविआ’त एकच खळबळ उडाली व दिवसभर ‘संशयकल्लोळ’ नाट्य रंगले. दरम्यान, शिवसेना फुटली की बंडखोर नेते संपतात, असा आजवरचा इतिहास आहे, असे सांगत शरद पवारांनी ‘आता ही लढाई विधानसभेच्याच प्रांगणात होईल’, असा इशारा देत बंडखोरांचे नीतीधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद दिवसभर उमटले. आघाडीतील पक्षांशी चर्चा न करता राऊत यांनी परस्पर केलेल्या या विधानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही शिवसेनेला भाजपसोबत जायचे आहे का? असा सवाल करत संशयात भर घातली. तर बंडखोरांनी ‘आता गाडी खूप पुढे गेली आहे,’ असे सांगत राऊतांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली.

दुसरीकडे अजित पवार हे काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास देतात, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात सध्या तरी मला कुठे दिसत नाही, असे सांगितले, तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांचे वक्तव्य नाकारत या बंडाला भाजपची फूस असल्याचे जाहीर केले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी बंडखोर आमदारांना २४ तासात परत या, मग शिवसेना मविआतून बाहे पडायला तयार असल्याचे वक्तव्य करून खळबळ माजवली. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत नाराजी प्रकट केली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन बदलत्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. राऊत यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याबाबत विचारणा करणार असल्याचे जाहीर केले.

logo
marathi.freepressjournal.in