राज्यसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता

 राज्यसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता

शिवसेना आणि भाजप या एकेकाळच्या मित्रपक्षांनी राज्यसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरवल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. आमदार मतदारांना खूश करण्यासाठी शिवसेना व भाजप अपापल्या परीने कामाला लागले आहेत. अनेकांना मतांसाठी वेगवेगळी आमिषे दाखविली जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे अपक्ष आमदारांना त्यांच्या मतदारसंघात भरघोस विकासनिधी देण्याचे प्रलोभन दाखविले जात आहे.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अपक्ष आमदार गळाला लावण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांबरोबरच अपक्ष आमदार आपल्याकडे कसे येतील, याबाबत रणनीती ठरवीत आहेत. मतदानाच्या दिवशी अपक्ष आमदारांचे मतपरिवर्तन होऊ नये किंवा अन्य पक्षाच्या प्रलोभनांना बळी पडू नये, यासाठी सर्व आमदारांना आपल्या ताब्यात ठेवण्याचा महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच भाजप यांचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये या आमदारांना ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेने आपले आमदार दक्षिण मुंबईतील ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचे ठरविले होते; मात्र भाजपही आपल्या आमदारांना त्याच हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची कुणकुण लागल्याने शिवसेनेने दगाफटका होण्याच्या भीतीने आपली जागा बदलली आहे.

भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपच्या मुख्यालयात त्यांनी रविवारी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोणत्या प्रकारची सावधानता बाळगायची, याबाबत मार्गदर्शन केले. भाजपचे संख्याबळ, आघाडीचे संख्याबळ याचा यावेळी आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर कोणते आमदार नाराज आहेत, त्यांना कसे गळाला लावता येईल, याबाबतही चर्चा करण्यात आली. तर भाजपचे पुणे येथील आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने त्यांना मतदानाला कसे आणायचे, याबाबतही चर्चा झाली.

शिवसेनेनेही चांगलीच कंबर कसली असून उद्या (सोमवारी) शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि सहयोगी पक्षास तसेच शिवसेनेसोबत असलेल्या अपक्ष आमदारांची बैठक पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. यात अनेक गोष्टींवर चर्चा होणार आहे. समाजवादी पार्टीने निवडणुकीत सहभागी न होण्याचा पवित्र घेतला आहे, तर आमदार हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीबरोबर येणार नाही. त्याचबरोबर शिवसेनेचे मराठवाड्यातील आमदार मतदानाला गैरहजर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व बाबींचा विचार त्या त्या पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सुरू असून त्यानुसार येत्या दोन दिवसांत रणनीती ठरविण्यात येणार आहे.

कोण तुरुंगात, कोण आजारी

राज्याचे माजी गृहमंत्री आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक सध्या कोठडीत आहेत. त्यांना मतदानाला परवानगी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे; मात्र अद्याप त्याला निवडणूक आयोगाने संमती दिलेली नाही. या दोघांना परवानगी नाकारल्यास राष्ट्रवादीची दोन मते कमी होणार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर भाजपचे पुण्यातील आमदार लक्ष्मणराव जगताप हेदेखील आजारी आहेत. कोरोना नियमांचे पालन करून फडणवीस मतदानाला हजर राहु शकतील; पण देशमुख आणि मलिक यांना मतदानाला परवानगी न मिळाल्यास सहाव्या उमेदवारासाठी शिवसेनेला आणखी दोन मतांसाठी झगडावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in