थट्टामस्करी अंगाशी आली, मुंबई उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस अटक

थट्टामस्करी अंगाशी आली, मुंबई उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस अटक

थट्टामस्करी म्हणून त्याने ईद आणि आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर धमकीचा कॉल केला होता

मुंबई : मुंबई उडवून देण्याची धमकी देणारा कॉल करणाऱ्या एका आरोपीस गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत मालवणी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. नसीमुल हसन रफिउल हसन शेख असे या आरोपीचे नाव असून, त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी सांगितले. थट्टामस्करीत बॉम्बच्या अफवेचा कॉल करणे नसीमुलच्या चांगल्याच अंगाशी आली आहे.

महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाला गुरुवारी दुपारी अडीच वाजता एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून मुंबई उडवून देणार असल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर संबंधित पालिका कर्मचाऱ्यांनी ही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती.

धमकीच्या आलेल्या कॉलची पाहणी केल्यानंतर तो कॉल मालाडच्या मालवणी परिसरातून आला होता. त्यामुळे ही माहिती मालवणी पोलिसांना देण्यात आली होती. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर या पथकाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपाासाला सुरुवात केली होती.

गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी नसीमुल शेख या ५० वर्षांच्या आरोपीस अटक केली. तो मालवणीतील गेट क्रमांक सात, खारोडी, आझमीनगरच्या अब्बासिया कंपाऊंडचा रहिवाशी आहे. थट्टामस्करी म्हणून त्याने ईद आणि आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर धमकीचा कॉल केला होता; मात्र ही थट्टामस्करी त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in